स्थानिकांचा शासनाला प्रश्न
। माथेरान । वार्ताहर ।
माथेराना गावातील बंगल्याचे माळी कामगार हे गावापासून खूपच दूरवर रहात आहेत. त्यांना रोज सहा ते सात किमीची पायपीट करत माथेरानमध्ये यावे लागते. तसेच, अनेकदा येथील रुग्ण व जेष्ठ नागरिकांना ई-रिक्षांची सेवा वेळेत उपलब्ध होत नाही. ई-रिक्षा सुरू झाल्यामुळेच येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून, याच माध्यमातून सर्वाना उत्तम प्रकारे रोजगाराच्या संधी मिळत आहेत. परंतु, या सेवेला एक वर्ष पूर्ण होऊन देखील ई-रिक्षांच्या संख्येत अद्यापही वाढ करण्यात आलेली नाही. शासनाने याचा लवकरच सकारात्मक विचार करून स्थानिक तसेच पर्यटकांना वाहतुकीची सुविधा निर्माण होण्यासाठी ई-रिक्षांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरू लागली आहे.
त्यातच वन ट्री हिल विभागातील नागरिक देखील आक्रमक झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, माथेरान मध्ये ई-रिक्षा सुरू होण्यासाठी आम्ही सुद्धा खारीचा वाटा उचलून वेळप्रसंगी विरोधकांच्या आवेशाला सामोरे गेलो आहोत. आम्ही गावापासून आणि दस्तुरी नाकापासून जवळपास 6 ते 7 किलोमीटर दूरवर रहात आहोत. येथे या ई-रिक्षांची संख्या खूपच कमी असल्याने आम्हाला अनेकदा पायपीट सुद्धा करावी लागते. त्यामुळे या स्वतंत्र देशात आम्हाला मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत की नाही, असा प्रश्न वन ट्री हिल विभागातील नागरिक उपस्थित करत आहेत.
वन ट्री हील परिसरात 52 कुटुंबे राहतात. त्यांना ई-रिक्षाची सेवा सुभाष सावंत यांच्या दुकानाच्या अर्ध्या मार्गापर्यंतच दिली जात आहे. परंतु, आम्हाला नेहमीच ई-रिक्षांसाठी तासनतास वाट पहावी लागते. हे फारच अन्यायकारक आहे. आमच्या येथून दस्तुरी नाका 7 किलोमीटर दूर आहे. ई रिक्षाही विशेषतः ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व महिलांसाठी खूपच सोयीची आहे. त्यामुळे राज्य सरकारने ई-रिक्षांची संख्या वाढवावी, जेणेकरून आमची पायपीट वाचू शकेल.
कल्पना पाटील,
रहिवासी वन ट्री हिल विभाग