सीईओ बास्टेवाड यांची माहिती
। रायगड खास । प्रतिनिधी ।
जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानाअंतर्गत 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील एक हजार 832 गावांपैकी एक हजार 11 गावे ‘हागणदारी मुक्त अधिक’ (ओडीएफ प्लस) घोषित करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यासाठी 916 गावे ‘हागणदारी मुक्त अधिक’ करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जिल्ह्यात गावे हागणदारी मुक्त अधिक होण्यासाठी गाव पातळीवर वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील सर्व संस्थात्मक ठिकाणी शौचालयाची सुविधा निर्माण करणे, शाळा, अंगणवाडी येथे शौचालयाची उभारणी करून त्याचा वापर करणे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण करून सांडपाणी व्यवस्थापनअंतर्गत शोषखड्डा आणि अन्य कामे पूर्ण करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. उर्वरित गावे पुढील काही महिन्यात हागणदारी मुक्त अधिक होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत.
जिल्ह्यात एक हजार 11 गावे ‘हागणदारी मुक्त अधिक’ (ओडीएफ प्लस) घोषित करण्यात आली असून, त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील 104 गावांचा समावेश आहे. तर कर्जत 113, खालापूर 100, महाड 113, माणगाव 73, म्हसळा 20, मुरुड 27, पनवेल 99, पेण 48, पोलादपूर 47, रोहा 79, श्रीवर्धन 37, सुधागड 78, तळा 46, उरण 27 गावांचा समावेश आहे.