नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यावर भर; 17 ते 31 ऑगस्ट या कालावधीत सर्वेक्षण
। रायगड । प्रतिनिधी ।
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आजही साक्षर भारताचे स्वप्न अधुरे राहिले आहे. असे असलेतरी वैज्ञानिक युगात ट्विट, इंस्टाग्राम , फेसबुक आणि मोबाईलवरील चॅटिंगचे तंत्रज्ञान पाय रोवत आहे. साक्षरता अभियान राबवूनही संपूर्ण देश साक्षर करण्यात यश आले नव्हते. हाच धागा पकडून आता साक्षरतेतून समृद्धीकडे जाण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवला जात आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 15 वर्षे आणि त्या पुढील वयाच्या निरक्षरांचा शोध घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नवभारत साक्षरता कार्यक्रमातून रायगड जिल्ह्यातील 6 लाख 94 हजार 206 निरक्षर नागरिकांचा शोध घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
शिक्षण विभागाच्या योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी या संदर्भातील सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या. 2022 ते 2027 या पाच वर्षांत नवभारत साक्षरता कार्यक्रम राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत राज्यातील निरक्षरांची नावनिहाय माहिती उपलब्ध नसल्याने, जनगणनेस बारा वर्षांहून अधिक कालावधी उलटल्याने प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2011 च्या जनगणनेतील निरक्षर संख्येनुसार रायगड जिल्ह्यातील 6 लाख 94 हजार 2026 निरक्षर नागरिकांचा शोध घेण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. यामध्ये 2 लक्ष 84 हजार 653 पुरुष आणि 4 लाख 9 हजार 333 महिलांचा समावेश आहे. राज्यातील निरक्षरांची संख्या निश्चित करणे, त्यांना ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देणे, हा सर्वेक्षणाचा उद्देश आहे. हे सर्वेक्षण 17 ते 31 ऑगस्ट या चौदा दिवसांत शिक्षकांना शाळा भरण्यापूर्वी आणि शाळा सुटल्यानंतर करावे लागणार आहे. या कालावधीतच शाळाबाह्य विद्यार्थी शोधमोहीमही राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शाळा हे युनिट म्हणून काम करणार आहे. सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळा; तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नगरपालिका शाळा, महानगरपालिका शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी क्षेत्र निश्चित करून सर्वेक्षक-शिक्षक यांची नियुक्ती मुख्याध्यापक करतील. या सर्वेक्षणामध्ये शाळा, गाव, तालुका आणि जिल्हानिहाय निरक्षरांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.
पनवेलमध्ये सर्वाधिक
रायगड जिल्ह्यात 2011 च्या जनगणनेनुसार 6 लाख 94 हजार 206 नागरिक निरक्षर असल्याचे दप्तरी नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक निरक्षर पनवेल तालुक्यात 1 लाख 74 हजार 555, अलिबाग तालुक्यात 52 हजार 262, पेण तालुक्यात 60 हजार 246, रोहा तालुक्यात 45 हजार 357, उरण तालुक्यात 39 हजार 36, मुरूड तालुक्यात 18 हजार 563, खालापूर तालुक्यात 56 हजार 823, कर्जत तालुक्यात 61 हजार 366, महाड तालुक्यात 48 हजार 210, पोलादपूर तालुक्यात 14 हजार 373, माणगाव तालुक्यात 46 हजर 218, म्हसळा तालुक्यात 17 हजार 627, श्रीवर्धन तालुक्यात 22 हजार 104, सुधागड तालुक्यात 24 हजार 410 आणि सर्वाधिक कमी निरक्षर तळा तालुक्यात 13 हजार 56 इतके आहेत.
घरोघरी माहितीचे संकलन
प्रत्यक्ष वस्ती, वाडी, गाव, खेडी, तांडे, शेतमळा, वॉर्ड अशा ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करावे लागणार आहे. सर्वेक्षणामध्ये निरक्षरांचे नाव, लिंग, जात प्रवर्गनिहाय अद्ययावत माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच त्याचे स्वतंत्रपणे विश्लेषण केले जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करावी लागेल. त्यासाठी त्यांची सर्वेक्षक म्हणून नियुक्ती केली जाईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्देशाप्रमाणे रायगड जिल्ह्यात निरक्षर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. तालुकास्तरावर गट शिक्षणाधिकारी यांना सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. निरक्षर शोध मोहिमेसाठी समिती गठीत करण्यात आली असून शासनाच्या आदेशाप्रमाणे मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.शिक्षकांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी योजना,
रायगड जिल्हा परिषद