। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान मध्ये व्हॅली क्रॉसिंग सारख्या साहसी खेळांमुळे मागील काही वर्षांपासून पर्यटकांची संख्या वाढली होती. या व्यवसायात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असल्याने बहुतांश पॉईंट्सवर या व्हॅली क्रॉसिंगचे जाळे पसरले आहे. त्यामुळे येथील पॉईंट्सचा देखावा न्याहाळताना जो आनंद हवा होता तो मिळत नव्हता. त्यातच व्हॅली क्रॉसिंगचा आनंद घेताना आजूबाजूला कचराकुंड्या नसल्याने पर्यटकांकडून सुका कचरा जंगलात फेकला जात होता. त्यामुळे जंगलाचा र्हास होऊ नये यासाठी वनखात्याने काही वर्षांपूर्वी सर्वच पॉईंट्सवरील व्हॅली क्रॉसिंगचे जाळे काढून टाकले होते. त्यामुळे पर्यटकांची संख्या मागील काळात काहीअंशी रोडावली होती. वनखात्याच्या जाचक अटी शिथिल झाल्यानंतरच याठिकाणी व्हॅली क्रॉसिंग या साहसी खेळाला मान्यता मिळू शकते. पर्यावरण मंत्रालय साहसी खेळांना प्रोत्साहन देतानाच रोजगार निर्मितीला चालना देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे आगामी काळात याठिकाणी बेरोजगार तरुणांना व्हॅली क्रॉसिंगच्या व्यवसायात संधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.