मुरुडमध्ये नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबीर
| कोर्लई | वार्ताहर |
नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून नागरी संरक्षण दलात भरती होऊन देशसेवा करण्याची सुवर्णसंधी असून याचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा. असे प्रतिपादन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी मुरुडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी केले. रायगड जिल्हाधिकारी तथा नियंत्रक नागरी संरक्षण – रायगड व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबिराचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, बीडीओ सुभाष वाणी, नागरी संरक्षण विभागाचे सहाय्यक उपनियंत्रक काशिनाथ कुरकुटे, शशिकांत शिरसाठ, विलास पाटील, अॅड. के.डी.पाटील, अॅड. भुपेंद्र पाटील,आयटीआय (मुरुड) प्राचार्य इस्तियाक घलटे, प्राचार्य साजिद शेख ,उदय सबनीस, समन्वयक तुफैल दामाद,बाजार जमात अध्यक्ष राशिद फहीम, उपाध्यक्ष मुसद्दीक कादरी,सचीव लियाकत रोगे,साईम दामाद,मकसुद कबले तसेच सामाजिक कार्यकर्ते व महाविद्यालयीन व तांत्रिक महाविद्यालयाचे विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.यावेळी समन्वयक तुफैल दामाद यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार गोविंद कोटंबे, अंजुमन इस्लाम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.साजिद शेख, विलास पाटील यांनी मार्गदर्शनपर मोलाचे विचार मांडले तसेच वेदांत अदनान माटवणकरसह दोन विद्यार्थ्यांनी पाच दिवसीय शिबीराबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी व नियंत्रक नागरी संरक्षण संस्था रायगड अलिबाग यांचे नियंत्रणा खालील नागरी संरक्षण दलात भरती व देशसेवा करण्याची सुवर्ण संधी नागरी संरक्षण दलात आपत्ती विषयक पाठ्यक्रम प्रथमोपचार, आयोजन, विमोचन नियंत्रण दळणवळण, सुरक्षा विषयक पाठ्यक्रमाची संधी असून यातून उज्वल भवितव्य घडू शकते.याबाबतचे महत्वपूर्ण प्रशिक्षण या पाच दिवसीय शिबीरात देण्यात आले.या शिबिराचा संपुर्ण तालुक्यातील 91 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.कार्यक्रमाला समन्वयक तुफैल दामाद यांचे उत्तम प्रकारे आयोजन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक ड.के.डी.पाटील यांनी तर साईम दामाद यांनी आभार मानले.यापुढील नागरी संरक्षण प्रशिक्षण मोफत शिबिर म्हसळा येथे दि.15 नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून याचा 18 वर्षे वयावरील नागरीकांनी लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.