रस्त्यांची-आळयांची जातीवाचक नावे बदलण्यास विरोध

| पेण | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नांवे बदलून नवीन नांवे देणे संदर्भात पेण नगरपालिकेत सभेचे आयोजन केले होते. या सभेत पेणकरांनी वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलण्यास कडाडून विरोध केला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक शासन निर्णय क्रमांक:- संकीर्ण- 2020/प्र.क्र.33/अजाकचा 11 डिसेंबर 2020 च्या आदेशानुसार राज्यातील अनेक शहरातील व ग्रामीण भागातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची नावे जातीवाचक असल्याने ही जातीवाचक नावे बदलून त्याऐवजी महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्यासाठी पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी नगरपालिकेच्या सभागृहात आजी-माजी लोकप्रतिनिधी विशिष्ट समाजाचे अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिक यांच्या सभेचे आयोजन केले होते.

या सभेमध्ये संतोष श्रृंगापूरे, दिपक गुरव यांनी नावे बदलल्याने काय परिणाम होतील व नावे बदलू नये अशी मते मांडली. तर कोळी समाज, गुरव समाज, मुसलमान समाज यांनी आपापल्या आळयांची नावे बदलण्या संदर्भात विरोध केला. संतोष पाटील यांनी नावे का बदलावी लागतील या संदर्भात कायद्याच्या बाबींविषयी माहिती दिली. यावेळी कुंभाळआळीचे नाव संत गोरा कुंभारआळी असे देण्यात यावे असे कुंभार समाजाने सांगितले. तर परिट आळीतील नागरिकांनी संत गाडगे महाराज आळी असे नामकरण करण्यास हरकत नसल्याचे सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी शासनाची बाजू समजून सांगत कुणाची नावे बदलण्यास हरकत असल्यास त्या लेखी स्वरुपात हरकती नगरपालिकेला द्याव्यात असे सांगितले. यावेळी राजू वारकर, निवृत्ती पाटील, अजय क्षिरसागर, सुनिता जोशी, प्रतिभा जाधव, तेजस्विनी नेने, हबीब खोत, कृष्णा भोईर अदींसह वेगवेगळया समाजाचे समाज अध्यक्ष उपस्थित होते.

Exit mobile version