शेकाप कार्यकर्त्यांनी बंद पाडले काम
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग रोहा मार्गावरील नादुरुस्त रस्त्यावर मातीने खड्डे भरत असल्याचे निदर्शनास येताच शेकाप कार्यकर्त्यांनी सदर कामाला विरोध करीत डांबराने खड्डे भरण्याची मागणी केली. त्यामुळे कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना काम थांबवावे लागले.
अलिबाग रोहा रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम चालू आहे. सदर खड्डे डांबराने भरण्याऐवजी मातीने भरत असल्याचे लक्षात येताच शेकापचे वरंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर चेरकर यांनी सदर कामाला विरोध दर्शविला. यावेळी त्यांनी सांगितले कि सध्या पाऊस गेला आहे. त्यामुळे कोल्ड डांबराने सदर खड्डे बुजवावेत. अन्यथा मातीने खड्डे भरण्यास विरोध केला. त्यावर सदर कंत्राटदाराने हे रस्ते आपण वर्क ऑर्डरशिवाय करत असल्याचे सांगितले. त्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांनी वर्क ऑर्डर काढूनच डांबराचा वापर करुन सदर रस्ते भरण्याची मागणी केली. मातीने खड्डे भरू नका. कारण मातीने खड्डे भरल्यानंतर पुन्हा ती निघून जाऊन त्याचा त्रास रोज प्रवास करणा-या सामान्य जनतेला होत असल्याचे निदर्शनास आणले. यावेळी सुधीर चेरकर यांच्यासह हेमंत पाटील, प्रणित पाटील, दिनेश टोपले, योगेश गुजर, मंगेश थळे, रामदास शिंदे आदी उपस्थित होते.
सदर बाब शेकापचे जिल्हा चिटणीस तथा राजिपचे आघाडीचे पक्ष प्रतोद अॅड आस्वाद पाटील यांची भेट घेऊन निदर्शनास आणले. त्यावर तातडीने आस्वाद पाटील यांनी बांधकाम विभागाचे अभियंता बागुल यांना संपर्क साधत सदर रस्ते डांबराने भरण्याची सुचना केली.