| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयांमध्ये पिक विमा या शासनाच्या महत्त्वकांक्षी संकल्पनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा या मुख्य उद्देशाने तालुक्यातील विविध भागांमध्ये कृषी विभागाने पीक विमा कॅम्पचे आयोजन केले आहे. यामध्ये वेश्वी, दिघोडे, बेलोंडे खार, जासई, चिरले, जांभूळपाडा, टाकीगाव, विंधणे, हरिश्चंद्र पिंपळे, बोरखार, रानसई, भोम, चिरनेर, कळंबूसरे , मोठी जुई, कोप्रोली, पिरकोन, वाशेनी, सारडे पुनाडे, खोपटा, नागाव, केगाव, येथे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा त्रास कमी व्हावा व त्यांचा वेळ वाचावा तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेऊन आपल्या पिकाला विमाच्या स्वरूपात संरक्षण मिळावे यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
पीक विमा उतरवण्याची अंतिम तारीख 31 जुलै असल्याने खूप कमी कालावधी शिल्लक राहिला आहे, अल्प दरात विमा उतरवता येत असल्याने महा-ई-सेवा केंद्र मध्ये शेतकऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही शक्यता लक्षात घेता कृषी विभागामार्फत विविध भागांमध्ये कॅम्प लावण्यात आले आहेत. या कॅम्पच्या आयोजनानंतरही काही शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहिले तरी त्यांना 31 जुलै पर्यंत महा-ई-सेवा केंद्रामध्ये अर्ज करू शकतात, याव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी आपला अर्ज 7/12 चा उतारा 8अ, बँक पासबुक आधार कार्ड पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन हप्ता भरून सहभाग घेऊ शकतात. पिक विमा साठी चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कं. वि या कंपनीची निवड करण्यात आली आहे. टोल फ्री क्रमांक 1800 20 89 200 हा आहे. अधिकच्या माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उरण कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळनारनवर यांनी केले.