नागरिकांमधून संताप, नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन शहरामध्ये मागील काही दिवसांपासून डासांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. परंतु, श्रीवर्धन नगरपरिषदेकडून डासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा डास मारण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही.
काही वर्षांपूर्वी श्रीवर्धन शहरातील नागरिक आपल्या घरातील सांडपाणी शोष खड्डा खोदून त्यामध्ये सोडत असत. परंतु, आता नवीन फ्लॅट संस्कृती आल्यामुळे अनेक इमारतींमधील पाणी उघड्या गटारांमध्ये सोडले जात असल्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. श्रीवर्धन शहरात नगरपरिषदेकडून कचरा उचलण्याचे काम अतिशय स्तुत्यपणे केले जात असले तरीही नगरपरिषदेने ज्या ठिकाणी गटारात सांडपाणी किंवा पावसाचे पाणी तुंबते अशा ठिकाणी कीटकनाशक फवारणी करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील इतर शहरांपेक्षा श्रीवर्धन शहर खरोखरच स्वच्छ ठेवण्यात नगरपरिषदेने चांगले काम केलेले आहे. परंतु, डासांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषदेने आता पावले उचलण्याची गरज आहे.
आठ ते पंधरा दिवसांपूर्वी संपूर्ण जिल्ह्यासह श्रीवर्धन शहरातदेखील प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे त्यावेळी कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याने, आता पाऊस थांबला असल्याने आपण आरोग्य विभागाला कीटकनाशक फवारणीचे आदेश दिले आहेत.
किरण कुमार मोरे, मुख्याधिकारी