सुधाकर लाड
‘लाड’ हा शब्द देशवाचक आहे. लाड म्हणजे लाट देश होय. गुजरातच्या दक्षिण व महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला प्राचिनकाळी देश म्हणत. या ‘लाट’ चाच अपभ्रंश होवून ‘लाड’ झाले. लाड शाखी लोक खानदेश व नाशिक या जिल्हयांत बहुसंख्येने आढळतात. लाड शाखीय लोकांची वस्ती इ.स. नवव्या किंवा दहाव्या शतकात महाराष्ट्रात झाली असावी. लाड शाखीय लोकांची मातृभाषा अहिराणी असून ती संस्कृत प्रचुर आहे. लाड शाखीय लोक उच्च वर्णियांत गणले गेले आहेत. आचार-विचार मराठ्यांंसारखेच दिसतात.
इ.स. 1682 च्या ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात टेंभुर्णी येथे शाहजादा आज्जमचा सरदार कुलीच खान हा छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलखात आला असतां संभाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते व सरदार विठोजी लाड वीस हजार घोडेस्वार व पायदळासह कुलीच खानाच्या सैन्यावर चालून गेले या लढाईत अनेक मोगल ठार झाले. शेवटी कुलीच माघारी फिरला आणि जीव वाचविण्यासाठी शाहजादा आज्जमकडे पळत सुटला. या लढाईत सेनापती हंबीरराव मोहिते व सरदार विठोजी लाड यांच्या बहाद्दर सैनिकांनी मोगली सैनिकांची अत्यंत वाईट अवस्था केली.
फेब्रुवारी 1682 रोजी औरंगजेब बादशहाने कासिम खान व रूहुल्लाह खान खांना त्यांच्या सैन्यासह तळ कोकणातील तोंडाशी जावे असा हुकुम केला होता. औरंगजेब हुकूम करण्याच्या मन:स्थितीत असल्याचा अंदाज छत्रपती संभाजी महाराजांना आला होता, म्हणून त्यांनी सरदार विठोजी लाड यांना कल्याण-भिवंडीकडे जाणार्या वाटा रोखण्यासाठी चार हजार घोडेस्वार व पायदळ देवून पाठवले होते. यावेळी कासिम खान व रूहुल्लाह खान यांना सरदार विठोजी लाडांनी आपल्या युध्द कौशल्याचा दणका दाखवला होता. सरदार विठोजी लाडांनी मोगली सैन्यावर व मागील बाजुने हल्ला करून मोगली सैन्याला खिंडीत गाठले. मोगलांविरूध्दच्या या कल्याण-भिवंडीच्या रणसंग्रामात स्वत: छत्रपती संभाजी महाराज सहभागी झाले होते. या रणसंग्रामात बहुतेक मोगल ठार झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने रूहुल्ला खान व कासिम खान यांना पराभूत केले. मराठ्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. विठोजी लाड यांचा ‘पायदळातील सरदार’ असा बखरीत उल्लेख आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठी स्वराज्याच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पराक्रमाची पराकाष्टा केली. छत्रपती संभाजी महाराजांनी मराठी स्वराज्याच्या राज्यकारभाराचे अधिकार हातात घेतल्यानंतर नऊ वर्षांच्या कालखंडातील प्रत्येक क्षण रणांगणात आणि राज्यकारभार पाहण्यात घालवला होता. पण पुढे औरंगजेबचा सरदार शेख निजाम उर्फ मुकर्रबखान याने संगमेश्वर जवळील नावडी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले. वड्बुद्रुक येथे औरंगजेबच्या छावणीत 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा देहान्त झाला.
मराठी स्वराज्य उखडून टाकण्यासाठी औरंगजेबाने या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेण्याकरीता इतिकादखानला सैन्य देवून किल्ले रायगडची मोहिम आखली. 25 मार्च 1689 रोजी दुसर्यांदा इतिकादखानने किल्ले रायगडच्या परिसरात येवून मराठ्यांच्या राजधानीला वेढा घातला. किल्ले रायगड भोवती वेढा घालून बसलेल्या मोगली सैन्याला शरणजात छत्रपती संभाजी राजांची पत्नी महाराणी येसूबाईंनी 3 नोव्हेंबर, 1689 रोजी किल्ले रायगड औरंगजेबचा सरदार इतिकादखानच्या स्वाधिन केला.
महाराणी येसूबाई बरोबर संभाजीपुत्र छत्रपती शाहू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई आणि किल्ले रायगडावर राहणार्या सरदारांच्या कुटुंबियांना, कित्येक विश्वासू नोकरांना इतिकादखनाने कैद केले. रायगडावर मिळालेली अमाप संपत्ती व या राजकैद्यांना घेवून इतिकादखान कोरेगांव येथे औरंगजेबाच्या छावणीत दाखल झाला. औरंगजेब इतिकादखानाने केलेल्या पराक्रमावर बेहद खुष झाला. संतुष्ट होवून त्याने इतिकादखानास ‘झुल्फीकारखान’ हा किताब दिला.
औरंगजेबाने छत्रपती शाहू महाराजांना सप्तहजारी मनसबदार केले. किल्ले रायगडावरून जिंकून आणलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार शाहू महाराजांना औरंगजेबने म्हणून दिली. राजधानी किल्ले रायगड मोगली सैन्याच्या ताब्यात गेला. याच दरम्यान मोगलांना आपल्या सैन्याचा पसारा आवरून मराठी प्रदेश सोडून दिल्लीकडे निघण्याचे ठरवावे लागले. छत्रपती शाहू महाराज, महाराणी येसूबाई, छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्नी सकवारबाई यांना ओलीस ठेवण्यासाठी मोगलांनी आपल्याबरोबर दिल्लीला नेले.
पुढे इ.स. 1707 साली औरंगजेबचा मृत्यु झाला आणि मराठ्यांंवरील आक्रमण संपले. दिल्लीला दिडतप मोलगांच्या नजरकैदेत घालविलेल्या छत्रपती शाहू महाराजांची, येसूबाईंची व सकवारबाईंची सुटका झाली. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या स्वराज्यात आल्यावर पाहिले की, राजधानी किल्ले रायगड व स्वराज्यातील महत्त्वाचे प्रदेश जंजिर्याच्या सिद्धी याकुतखानाच्या ताब्यात आहेत.
किल्ले रायगड जिंकल्याचे श्रेय गदाधर प्रल्हाद या छत्रपती शाहूंच्या प्रतिनिधीला व फत्तेसिंग भोसले यांना या लढाईत सरदार नारायण झुंंजारराव देशमुख, सरदार जावजी लाड इत्यादी अनेक शूरवीर लढले. किल्ले रायगड जिंकण्यासाठी मराठयांनी केलेल्या पराक्रमाची किर्ती निजामशाहीत व दिल्लीच्या बादशाहापर्यंत पोहोचली.
मराठी स्वराज्याच्या संरक्षणासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दित सतराव्या शतकाच्या आरंभी थोरले बाजीराव पेशवे, सरखेल कान्होजी आंग्रे, बाजीरावांचा भाऊ चिमाजी आप्पा, फत्तेसिंग भोसले, गदाधर प्रल्हाद इत्यादी पराक्रमी विरांच्या तलवारी पराक्रम गाजवित असतांना सरदार जावजी लाड यांची तलवार पराक्रम गाजवीत होती. सरदार जावजी लाड यांनी किल्ले रायगड जिंकताना गाजविलेल्या पराक्रमावर खूष होवून छत्रपती शाहू महाराजांनी सरदार जावजी लाड यांचेवर राजधानी किल्ले रायगडच्या सरनोबत पदाची जबाबदारी सोपविली. सरदार जावजी लाड सरनोबत झाले. पराभूत झालेल्या सिध्दी याकूत नागासारखा फणा काढून पुन्हा किल्ले रायगड ताब्यात घेण्यासाठी तयारी करीत होता.
छत्रपती शाहू महाराजांचे सरखेल कान्होजी आंग्रे यांना सागरी लढाईत गुंतवून ठेवण्यासाठी सिध्दी याकुतने इंग्रजांचे आरमार आणि सैन्य इंग्रजांशी यशस्वी मसलत करून आपल्या बाजुने उभे केले. सिध्दी याकूतचा सरदार शामल जंजिरकरने 1733 ला बाणकोट घेतले. किल्ले रायगड परिसरातील गोरेगांव, विन्हेरे, तुडील या गावांवर सिध्दी याकूतच्या सैन्याचा अंमल सुरू झाला. मराठी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड परत पारतंत्र्यात जाणार की काय? आणि नामुष्कीचा प्रसंग परत येणार की काय? अशी परिस्थिती उद्भवली. अशा बिकट प्रसंगी छत्रपती शाहू महाराजांनी गदाधर प्रल्हाद या आपल्या प्रतिनिधीशी किल्ले रायगडच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली आणि त्यांनी थोरले पेशवे, चिमाजी आप्पा यांना मातब्बर सरदारांबरोबर किल्ले रायगडच्या संरक्षणासाठी फौज पाठवा अशी आज्ञापत्रे पाठविली.
चिमाजी आप्पाने रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी थांबावे अशी व्यूहरचना आखण्यात आली. छत्रपती शाहू महाराजांनी आपले सैन्यही पाठविले ते 5 जानेवारी 1734 ला पोलादपूरला पोहचले. थोरल्या बाजीरावाने महाडमार्गे मराठा सैन्यास रसद पुरविण्याची व्यवस्था केली. हळू हळू मराठा तुकडया किल्ले रायगडच्या पायथ्याशी जमू लागल्या. सरदार कृष्णाजी पवार, विश्वनाथ पवार, सोमवंशी बंधू, हरी पंतराजाज्ञा, उदाजी पवार, देवराय मेघशाम, वाईचा शेख मिरा, कृष्णराव खटावकर, राघो व्यंकटेश, आनंदारा बहिराव, बाजी भिमराव, इत्यादी मातब्बर सरदारांच्या तुकडया किल्ले रायगडच्या पायथ्याशी जमा झाल्या. या मराठी सैन्याने प्रथम किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या सिध्दी अंबर सैन्याशी लढाईची शर्थ केली आणि सिध्दीच्या ताब्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेली रायगडवाडी ताब्यात घेतली. नंतर पाचाड घेतले. किल्ले रायगडच्या पायथ्याशी मराठे आणि सिध्दीच्या सैन्यात सुरू असलेल्या या घनघोर लढाईत ‘हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज कि जय’ अशी गर्जना करीत किल्ले रायगडचे सरनोबत सरदार जावजी लाड बेभान होवून आपल्या उतरले. सरदार जावजी लाडांनी पराक्रमाची शर्थ केली आणि किल्ले रायगडच्या दरवाजा समोरील सिध्दी अंबरचा मोर्चा पहिल्यांदा जाळून टाकला. सिध्दी अंबरकडे सातशे कसलेले योध्दे होते. या योध्दयांमध्ये जिवाची पर्वा न करतां उदाजी पवार घुसले आणि सिध्दी अंबरला सामोरे जावुन तलवारीच्या एका वारात त्यांनी ठार मारले. मराठी योध्दयांनी सिध्दीच्या पुष्कळ सैनिकांना काढले. किल्ले रायगडच्या पायथ्याच्या परिसरात रक्तामासाचा चिखल झाला. सिध्दीचे सैन्य चारी दिशांना पळत सुटले. सिध्दीचे काही सैनिक महाडकडे पळून गेले. घनघोर झालेल्या या लढाईत किल्ले रायगडचे सरनोबत सरदार जावजी लाड शामल जंजिरकरशी लढताना रक्तबंभाळ झाले आणि रायगडच्या पायथ्याशी कोसळले.
मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे चरणस्पर्श झालेली रायगडची मूठभर कपाळाला लावून किल्ले रायगडचे शेवटचे डोळे भरून दर्शन घेत सरनोबत सरदार जावजी लाडांनी आपले प्राण सोडले. तो दिवस होता 10 जानेवारी, 1734. सरदार कृष्णराव खटावकर व किल्ले रायगडवरून आलेल्या अनेक मराठा सैनिकांनी या लढाईत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगडचे संरक्षण करीत रायगडवाडी, पाचाड परिसर सत्तेपासुन या शूरवीरांनी कायमचा हिसकावून घेतला आणि एक नवा इतिहास घडविला.