। पॅरिस । विनायक दळवी ।
भारताची ऑलिम्पिक ‘पदकपदी’ मनू भाकर हिने भारतीय नारीशक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय देत सरबतज्योतसिंग याच्या साथीने पॅरिस ऑलिम्पिकमधील दुसरे पदक पटकाविले. सरबज्योतसिंगच्या साथीने, मनू भाकरने 10 मीटर्स एअर पिस्तुल मिश्र दुहेरीचे कांस्यपदक पटकाविले. चॅटेअरॉक्स या पॅरीस शहरापासून दूर असलेल्या शूटिंग रेंजवर भाकर-सरबज्योत जोडीने कोरियाच्या ओ-ए-जिन आणि वोन-हो-लिन या जोडीचा पराभव केला. दोनच दिवसांपूर्वी याच क्रीडाप्रकारात (10 मीटर्स पिस्तुल) ओ-ए-लिन हिने सुवर्णपदक पटकाविले होते.
याच ओ-ए-लिनला आज मनूने पूर्णपणे झाकोळून टाकले. पहिल्या 7 फेरींमध्ये 10 गुण पटकाविणार्या मनु भाकरच्या तुलनेत कोरियाची सुवर्णपदक विजेती निष्प्रभ ठरली. त्यामुळे भारतीय जोडीने आरंभालाच 8-2 अशी मोठी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर कोरियन जोडीने स्वतःला सावरले आणि पिछाडी 10-14 अशी भरून काढली.
अखेरच्या फेरीत लिनला फक्त 9 गुणच नोंदविता आले. तिच्या जोडीदाराने 9.5 गुण नोंदविले. मनूनेही अखेरच्या फेरीमध्ये 9.4 गुणांची नोंद केली; पण यावेळी सरबज्योतसिंगने 10.2 गुण मारून लक्ष्य अचूक साधले आणि भारताला कांस्यपदक मिळाले. अनुभवी कोरियन जोडीच्या तुलनेत भारतीय जोडीचे आज नेम अधिक अचूक लागले. भारतीयांनी 26 पैकी 19 वेळा झाडलेल्या फेरींच्या वेळी 10 किंवा त्यापेक्षा अधिक गुणांची नोंद झाली. उलट दक्षिण कोरियन नेमबाजांना फक्त 12 वेळाच 10 किंवा त्यापेक्षा अधिक गुणांची नोंद करता आली.
या स्पर्धेत टर्किवर 16-14 असा चुरशीचा विजय मिळवून सर्बियाच्या झोरात अरूनोनिक्-दमिद माईक यांनी सुवर्णपद पटकाविले. मनु भाकरच्या रूपात अजूनही नेमबाजीतील भारताचे आव्हान जिवंत आहे. महिलांच्या 25 मीटर्स पिस्तुल प्रकारात मनु भाकर येत्या शुक्रवारी (दि.2) सहभागी होणार आहे.
124 वर्षापुर्वीच्या विक्रमाची बरोबरी
1900 नंतर थेट 2024 मध्ये एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील मनु ही पहिली खेळाडू ठरली. 1900च्या खेळांमध्ये जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीत होता तेव्हा नॉर्मन प्रिचर्ड यांनी अॅथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती. प्रिचर्डनंतर एकाही भारतीय खेळाडूला एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकता आलेली नाहीत. सुशील कुमार (कुस्ती) व पी व्ही सिंधू (बॅडमिंटन) यांनी भारतासाठी दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले आहे.
आई वडिलांना आनंद आवरेना
भारतीय नेमबाज मनु भाकरने कांस्यपदक जिंकल्यानंतर तिची आई सुमेधा भाकर म्हणाली की, “खूप आनंदी आहे. खरंच मी दोन्ही मुलांसाठी (मनु भाकर आणि सरबज्योत सिंग) खुप आनंदी आहे. मी काल तिला फक्त एकच सांगितले की नीट खाऊन लवकर झोप आणि आनंदी रहा, जर काही टेन्शन आले तर सगळ्यात आधी मला फोन करशील. पण आता तिला जसपाल सरांचे मार्गदर्शन लाभल्याने मला खरचं आनंद झाला. मी आज सकाळी पेपरमध्ये गुरू आणि शिष्य यांच्याबद्दल बातम्या वाचू खूपच आनंद झाले. तिचे वडील राम किशन भाकर म्हणाले की, ‘ही खूप चांगली बातमी आहे, यासाठी मी देशवासीयांचे खूप प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल आणि मनुला मदत केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की ती भविष्यात चांगले करेल.
तिसर्या पदकाची आशा
मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आणखी एका प्रकारात पदकासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. ती 25 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भाग घेणार आहे. 2 ऑगस्टला 25 मीटर एअर पिस्तुल प्रकाराची पात्रता फेरी दुपारी 12.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. जर यात मनु पात्र ठरली, तर ती 3 ऑगस्टला दुपारी 1 वाजता पदकाच्या शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.
मनुच्या प्रशिक्षकांना नोकरीची चिंता
मनु भाकर इतिहास घडवत असताना तिचे कोच जसपाल राणा यांना भारतात परतल्यावर नोकरीची चिंता लागली आहे. जसपाल राणा यांनी 1996च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर व 50 मीटर नेमबाजीत सहभाग घेतला होता. त्यानंतर ते ऑलिम्पिक स्पर्धा खेळले नाही, परंतु 2024 मध्ये ते मनु भाकर हिच्या आग्रहाखातर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पिस्तुलात बिघाड झाल्यामुळे मनुला फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता आणि त्यावेळी राणा यांना खलनायक ठरवले गेले. ते म्हणाले, मनु आता स्टार आहे. मी बेरोजगार प्रशिक्षक आहे. मी आता कोणीच नाही. मनुने मला मदत करण्यास सांगितली अन् मी इथे आलो. मला लवकरच नोकरी शोधावी लागेल. मागील तीन वर्ष माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती.