उपाययोजना करा, जनतेची मागणी
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
पालीत नेहमीच नागरीक व भाविकांची मोठी रेलचेल सुरु असते. अरुंद रस्ते व भाविकांची वाहने यामुळे वाहतुक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाल्याचे दिसून येते. वाहतूक कोंडी ने डोकेदुखी वाढली आहे. यावर ठोस उपाय निघत नसल्याने सारे त्रासले आहेत. यात अवजड वाहतूक त्रास दायक ठरत आहे. अनेकदा रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकत असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.
रुग्ण वेळेत पुढील दवाखान्यात पोहचण्यास विलंब होत आहे. पालीत सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीवर रामबाण उपाय असलेला बायपास (मार्ग) केवळ घोषणेत अडकल्याचे दिसत आहे. या समस्येवर आ.रविशेठ पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळात प्रश्नोत्तर चर्चेदरम्यान प्रश्न उपस्थित केला होता.
पाली शहरातील वाहतूक समस्येमुळे येथील रस्ते हे एकेरी करण्यात आले असून श्री बल्लाळेश्वर मंदिर येथे व विळे भागाड माणगाव कडे जाणार्या या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे पाली शहरातील वाहतूक समस्या ही जटिल होत चाललेली आहे. वाहतूक समस्येचा स्थानिक प्रवाशांना तसेच भाविकांना त्रास न होणेकरिता शहरातील महत्वाचे नाके येथे प्रशासनाकडून वाहतूक पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येत असते. पाली शहरास वर्तुळाकृती बाह्यवळण रस्ता असा रस्ता कोणत्याही योजनेतून मंजूर नाही . परंतु पाली पाटनुस रस्ता रा.मा. 94 या रस्त्यास पर्यायी रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत प्रस्तावित आहे. पाली पाटनुस रस्त्यास पर्यायी पाली गावातून वळण रस्ता करणे कि. मी 00/00 ते 3/00 या कामाकरिता जमीन भूसंपादन करणे या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. पाली गावास पाली पाटनुस रस्ता रा.मा 94 या रस्त्यास पर्याय रस्ता करणे या कामास प्रशासकीय मान्यता असून, सदर कामासाठी लागणार्या जागेची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादन करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही शक्य असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले होते. मात्र अद्याप पाली बलाप बायपास मार्ग प्रक्रियेला कोणत्याही प्रकारची गती मिळताना दिसत नाही, परिणामी भूसंपादन च होत नसेल तर बायपास चे काम कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित होतोय.






