पास्को कंपनीची धोकादायक वाहतूक

अवजड वाहतुक बंदी पुन्हा सुरू

| धाटाव-रोहा | प्रतिनिधी |

गेल्या वर्षभरापासून रोहा रेल्वे स्टेशन यार्डमधून विळे येथील पास्को कंपनीत मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या ट्रेलरमधून अवजड व धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक करण्यात येते. त्याचा प्रचंड धोका व त्रास रेल्वे स्टेशन लगतच्या रोहिदासनगर मधील रहिवासी वर्गासह रोहे अष्टमीकरांना सहन करावा लागत आहे. त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अवजड वाहतूक बंदी आणि संभाव्य धोक्याचा प्रश्न अधांतरीत ठेवल्याने यामध्ये नक्की गौडबंगाल तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या वर्षभरापासून रोहा रेल्वे स्टेशन यार्ड येथून लोखंडी कॉईलची वाहतूक विले-भागाड येथील पास्को कंपनीत मातेश्वरी ट्रान्सपोर्ट या एजन्सीच्या ट्रेलरमधून केली जात आहे. या अवजड मालाची वाहतूक शहराच्या मुख्य मार्गावरून होत असून या करिता नगरपरिषदेकडून कोणत्याही प्रकारचा परवाना घेतलेला नाही. या अवजड आणि धोकादायक वाहतूकीमुळे कोणत्याही क्षणी दुर्देवी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रोहे शहरातून अवजड मेटल कोईल्सच्या वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे व मुख्याधिकारी अजय कुमार एडके यांनी पोलीस उप अधीक्षकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
सद्या अष्टमी येथील रोहिदास नगर व शहारातील बाह्यवळ मार्ग येथून जीवघेण्या मेटल कोईल्स वाहतूक सरार्सपणे होत आहे. या अवजड, धोकादायक व जीवघेण्या ट्रेलरमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या समस्येची तक्रार रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्याकडे रोहिदास नगरसह सर्वच रोहे अष्टमीकर नागरिकांनी करताच त्यांनी तातडीने या गंभीर समस्येकडे आपले लक्ष वेधले. आपल्या शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी व मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र पोलीस उपविभागीय अधिकारी यांना देत यावर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे या संदर्भात तक्रार करुन एक महिना लोटला तरी आजवर या अवजड वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लागलेले नाहीत. उलटपक्षी अवजड ट्रेलरची दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. दिवसढवल्या व रात्री अपरात्री होणारी ही वाहतूक सर्वच प्रकरच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे.

रोहा रेल्वे स्थानकालगत जे.एस.डब्लू. कंपनीचे स्वतंत्र रेल्वे यार्ड आहे. याठिकाणी सुरुवातीला लोखंडासाठी लागणारा कच्चा माल भुकटी व गोटी उतरून त्याची वाहतूक डोळवी-साळाव येथे करण्यात येत होती. रस्ते वाहतूक व नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या या वाहतूकीस वेळोवेळी स्थानिकांनी विरोध करीत यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. यांसबधी नागरिकांना त्रासदायक असणाऱ्या या वाहतूकीला समीर शेडगे यांनी लोकभावानेतून नेहमीच विरोध करीत तत्कालीन प्रांत, व पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर हि समस्या मांडली होती. त्यानंतर ही वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. आता याच यार्डातून 24 टन वजनाच्या लोखंडी कॉईलची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. रेल्वे यार्डपासून अरुंद व कच्चे रस्ते आहेत, त्यामधूनच पिंगळसई पंचक्रोशी व रोहिदास नगर येथील नागरिकांची ये-जा सुरु असते. रेल्वे फाटकापासून कुंडलिका नदीवर हादरे घेत असलेला अष्टमी पूल, बाह्यवळ मार्ग व पुढे कोलाड मार्गे हि वाहतूक विळे भागाड येथील पास्को कंपनीपर्यंत करण्यात येते. दरम्यान, पिंगळसई पंचक्रोशी मधील धामणसई, सोनगाव, गावठाण, मालसई, मूठवली या गावातील नागरिकांसह अष्टमी मधील नागरिकांना रुंद व सुरक्षित रस्ते या कंपन्यानी द्यावे, त्यानंतरच हि अवजड व धोकादायक वाहतूक येथून करावी, अशी रीतसर मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. असे असतानाही पोस्को व्यवस्थापन याकडे गांभीर्याने दुर्लक्ष का करीत आहे, असाही प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

मातेश्वरी ट्रान्सपोर्टकडून जे.एस.डब्लू. कंपनीच्या रेल्वे यार्डातुन पास्को कंपनीमध्ये अवजड कॉईलची वाहतूक परिसरातील रहदारीच्या रस्त्यावरून होते. हे रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यामध्ये हे प्रत्येकी 24 टन वजनाचे एक किंवा दोन कॉईल वाहतूक ट्रेलर जात असताना जीव मुठीत घेत स्थानिकांना मार्ग काढावा लागतो. तसेच, याठिकाणी रात्रीच्या वेळी होणारी वाहतूक ही सर्वच दृष्टीने धोकादायक आहे.

महेंद्र मोरे, सामाजिक कार्यकर्ते

Exit mobile version