| मुंबई | प्रतिनिधी |
दादर रेल्वे टर्मिनलमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दादर रेल्वेमध्ये उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमध्ये शौचालयात एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. ही घटना रणकपूर एक्स्प्रेसमध्ये घडली आहे.
रणकपूर एक्स्प्रेस दादर स्टेशनवर उभी असताना आरपीएफकडून रेल्वेची तपासणी करण्यात आली. अगदी कमी प्रवासी यावेळी ट्रेनमध्ये होते. आरपीएफने एक्स्प्रेसच्या डब्ब्यातील शौचालयाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा कोणी आतून उघडत नव्हते. शेवटी दरवाजा तोडण्यात आला. यानंतर चक्क शौचालयामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह दिसला. एका व्यक्तीने टॉवेलच्या मदतीने शौचालयामध्ये आत्महत्या केली. या घटनेने काहीवेळ मोठी खळबळ निर्माण झाली. यानंतर रेल्वे पोलिसांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मृत व्यक्तीच्याजवळ कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सापडले नाही. गाडी दादरमध्ये आल्यावरच या व्यक्तीने फाशी घेतली की, अगोदरच याचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे. हा व्यक्ती कोण, कुठून आला, आत्महत्या करण्याचे कारण देखील शोधले जात आहे. बुधवारी (दि.29) उशीरा रणकपूर एक्स्प्रेस दादर स्टेशनवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मात्र, या व्यक्तीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे अजून कळू शकले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.