| कल्याण | प्रतिनिधी |
अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी कल्याण, डोंबिवलीतील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 13 जणांना विविध भागातून अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख 55 हजार रूपयांचा गांजा, एमडी पावडर, गुंगी आणणाऱ्या प्रतिबंधित कोडिनयुक्त बाटल्या जप्त केल्या आहेत.
अंमली पदार्थ विरोध पथकाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. स्थानिक पोलीस या मोहिमेत सहभागी होत आहेत. या प्रकरणात कल्याणमधील बाजारपेठ, खडकपाडा, कोळसेवाडी, डोंबिवलीत मानपाडा, टिळकनगर, विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून 45 हजार रुपये किमतीच्या 40 गुंगीकारक प्रतिबंधित कोडिनयुक्त बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणात दोन जण अटकेत आहेत. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत 31 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम एमडी पावडर, दोन हजार 180 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. बाजारातील त्याची किंमत 32 हजार रूपये आहे. याप्रकरणात चार जण अटकेत आहेत. कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत सात हजार रूपये किमतीचा 144 ग्रॅम गांजा एका इसमाकडून जप्त करण्यात आला आहे. मानपाडा, टिळकनगर, विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत 80 हजार रूपये किंमतीचा 3207 ग्रॅम गांजा, मानपाडा हद्दीत नऊ हजार रूपये किंमतीचा 391 ग्रॅम वजनाचा गांजा, एक लाखाहून अधिक किमतीची 34 ग्रॅम एमडी पावडर , टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत 44 हजार रूपये किमतीच्या 192 प्रतिबंधिक कोडिनयुक्त बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणात एकूण सहा जण अटकेत आहेत.