। महाड । वार्ताहर ।
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून काही खासगी बसेसदेखील ठेकेदारी पद्धतीने सुरू आहेत. या बसेसवरील चालकांच्या मनमानी कारभारामुळे एसटी प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत. यामुळे अनेक एसटी बसेसची आरक्षण सुविधा रद्द करण्याची पाळी महाड एसटी बस स्थानकावर आली आहे.
महाराष्ट्र एसटी महामंडळाने खाजगी तत्त्वावर काही गाड्या सुरू केल्या आहेत. या बसेस खाजगी प्रवासी वाहतूक ठेकेदार कंपनीकडून घेण्यात आल्या आहेत. या बसेसवरील चालकदेखील खाजगी तत्त्वावर नेमण्यात आले आहेत. एसटी आगारामधील लांब पल्ल्याचा प्रवास या खाजगी प्रवासी बसेस या खाजगी ठेकेदारांना अधिकतम देण्यात आलेल्या आहेत. केली काही दिवसांपासून या खाजगी बसेस वेळेत सुटत नसल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. खाजगी बसेस वरील चालक एसटी वेळापत्रकाच्या नियोजित वेळेत दाखल होत नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यातच अनेकवेळा चालक उपस्थित राहत नसल्याने ज्या प्रवाशांनी आपली जागा आरक्षित केलेली असते त्या प्रवाशांना ऐनवेळी दुसरी बस पाहण्याची वेळ येते. यामध्ये प्रवाशांचा वेळ आणि पैसा देखील वाया जात आहे. यामुळे महाड एसटी आगाराच्या अनेक बसेसचे आरक्षण सुविधा रद्द करण्यात आली आहे. याचा त्रास प्रवाशांना बसत असला तरी खाजगी ठेकेदारांचा वरिष्ठ पातळीवरील वरदहस्त असल्याने अधिकार्यांना तोंडावर बोट ठेवण्याची पाळी येत आहे.
याबाबत प्रवाशांनी अनेक वेळा तक्रारी नोंदविल्या आहेत मात्र सदर बसेस पुरवठादार यांचा वरिष्ठ कार्यालयापासून वरदहस्त असल्याने स्थानिक पातळीवरील अधिकारी याबाबत पावले उचलताना हात आखडता घेत आहे. महाड एसटी आगारामध्ये जवळपास 17 बसेस या पद्धतीने कार्यरत आहेत. धुळे, जळगाव, पुणे, अक्कलकोट, बोरिवली, यांसह पनवेल अशा लांब पल्ल्याच्या बसेस खाजगी ठेकेदारांकडून चालवल्या जात आहेत. 400 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर या बसेसना 47 रुपये प्रमाणे तर त्याबाहेर प्रवास झाल्यास 44 रुपये दिले जातात. तर देण्यात येणार्या डिझेलची रक्कम मात्र वजा केली जाते. महाड एसटी बसेस मधील बसेसचा सुमारे दीड ते दोन लाख किमीचा प्रवास होतो. याकरिता महाड एसटी आगाराकडून महिन्याला सुमारे 50 लाख रुपये या खाजगी बसेसना दिले जातात.
महाड एसटी आगारामध्ये जवळपास 17 खाजगी बसेस उपलब्ध आहेत. चालकांच्या बाबतीत यापूर्वी तक्रारी आल्या होत्या.त्यानुसार विभागीय वाहतूक अधिकार्यांना कळविले आहे. काही बसेसचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे
रितेश फुलपगार,
आगार व्यवस्थापक महाड