| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
या वर्षीच्या अधिक श्रावण महिन्यामुळे गणेशोत्सव एक महिना लांबल्याने कोकणातील पपनस पिक हातचे गेले आहे. तसेच पपनसावर पडणाऱ्या कीड रोगावर संशोधन संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत येथील बागायतदार शेतकरी व्यक्त करीत आहेत. संत्री, मोसंबी या वर्गातील परंतु आकाराने मोठे चवीला आंबटगोड काहीसे तुरट लागणारे पपनस हे फळ रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन आदी तालुक्यातील किनारी भागात विशेषत: श्रावण महिन्यापासून तयार होणारे नारळ-सुपारीच्या भागांतील एक प्रमुख आंतरपीक आहे.या पिकांच्या उत्पादनामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात बागायतदारांना चार पैसे हमखास मिळतात. विशेषतः कोकणातील गौरीच्या ओवशांच्या सुपात पपनसाच्या फळांना मोठे स्थान मिळते.
गणपतीच्या मखराचीही पपनस फळे शोभा वाढवितात. म्हणूनच पिठोरी अमावस्येच्या दरम्यान ठिकठिकाणचे छोटेमोठे व्यापारी पपनस फळांची खरेदी करतात. ऐन पावसाळी हंगामात ती तयार होत असल्याने अशा दमट वातावरणात तयार फळांना कीड लागते. या कीडीच्या प्रादुर्भावामुळे तयार फळांना गळ लागते. कीडीने पोखरल्याने फळ नासण्याची प्रक्रिया सुरू होते.एकदा गळ सुरू झाली की पूर्ण झाड खाली होते. यंदाच्या हंगामात अधिक श्रावणामुळे गणेशोत्सव एक महिना लांबला दरम्यानतयार फळांसह कीडग्रस्त फळांना मोठी गळती लागली आहे. गणपती, गौरींना अजून पंधरा दिवसांचा कालावधी असल्याने तयार पपनस फळांचा सडा बागायतीत पडलेला दिसून येत असून यावर्षी येथील बागायतदार शेतकर्याचे पीक हातचे गेले आहे.