पाच्छापूर फाट्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
| पाली | प्रतिनिधी |
नेहमीच विकासाच्या व्याख्येपासून दूर राहिलेल्या सुधागड तालुक्यातील नऊ गावांमधील ग्रामस्थांनी आता विभागातील असुविधांचा आनंद घेण्यासाठी एक अतिशय अनोखी आणि उपरोधिक शक्कल लढवली आहे. पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर या तब्बल साडेचार किमीच्या रस्त्यावरील खड्ड्यांकडे पाहता, सामान्य माणसांना चंद्रावर पोहचणे शक्य नसल्याने त्यांना चंद्रावर सफर करण्याचा अनुभव देण्याची व्यवस्था केली आहे. रविवार दि.5 जुलै रोजी या खड्डेमय रस्त्यावर पिकनिकचे आयोजन करण्यात आले आहे. या अनोख्या ट्रेनिंग सुविधेबद्दल प्रशासनाचे आभार मानण्यासाठी येथील ग्रामस्थांनी थेट ‘चंद्रावर पिकनिकला चला’ असे उपरोधिक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
या उपहासात्मक सहलीला गेल्या महिन्यापासूनच सुधागड तालुक्यातील असंख्य नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शवला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात याच नऊ गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणी आणि श्रमदानातून साडेचार किलोमीटरचा रस्ता तात्पुरता दुरुस्त करून प्रशासनाचा ताण कमी केला होता. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने आपल्या निसर्गरम्य धोरणानुसार या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. परिणामी, सध्या या रस्त्याची अवस्था हुबेहूब चंद्रावरील विवरांसारखी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नऊ गाव संघर्ष समिती, शहरवासी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत डिजिटल आणि प्रिंट मीडियासह सर्व पर्यटकांना व हितचिंतकांना रविवार 5 जुलै रोजी पाच्छापूर फाटा येथे या चंद्रावरील पिकनिकसाठी एकत्र येण्याचे जाहीर आवाहन केले आहे. आपल्या मायबाप सरकारने सर्वसामान्यांना चंद्रावरील पृष्ठभागाचा अनुभव घेण्यासाठी ही सुवर्णसंधी दिली आहे. हा रस्ता चुकून सिमेंट काँक्रीटचा गुळगुळीत होण्याआधी, प्रशासनाने दिलेल्या या सुवर्णसंधीचा आणि खड्ड्यांचा लाभ घ्या, असा सणसणीत टोला या पोस्टरच्या माध्यमातून सरकारला लगावण्यात आला आहे.
यातच खरे सुख आहे
सध्या या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले, रुग्ण आणि स्थानिक नोकरदार वर्गाला ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा थरारक अनुभव घेत, जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. आधीच मोबाईल नेटवर्क नसणे आणि इतर नागरी सुविधांचा अभाव यांमुळे त्रस्त असलेल्या या नऊ गावांतील ग्रामस्थांना आता ‘यातच खरे सुख आहे’ असे वाटू लागले आहे. या अभिनव पिकनिकच्या कल्पनेमुळे तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रशासनाच्या या खास कामगिरीची जोरदार चर्चा रंगली आहे. हि पिकनिक अधिक आनंददायी व्हावी, यासाठी शहरवासी व स्थानिक ग्रामस्थ विशेष प्रयत्न करीत आहेत.







