ग्रामपंचायत शिपाईपदाच्या भरतीमध्ये सावळागोंधळ?
| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील तीन तलाठी सजेमधील कोतवाल पदांसाठी उद्या आरक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ग्रामपंचायत शिपाई पदाच्या भरतीमध्ये मात्र सावळागोंधळ असल्याची बाब उघडकीस आली आहे.
राज्यसरकारने महसूल विभागातील कोतवाल पदांच्या भरतीमध्ये सुसूत्रता राहण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित तालुक्याचे तहसिलदार हे सदस्य सचिव, मागासवर्गीय अधिकारी वर्ग ब, महिला अधिकारी वर्ग ब आणि गटविकास अधिकारी आदी सदस्यांची निवड समिती तयार केली आहे. यानुसार, पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर, वाकण आणि उमरठ या तीन तलाठी सजांमध्ये कोतवाल रिक्त पदांची भरती करायची असून यापैकी 80 टक्के म्हणजेच दोन पदांसाठी आज गुरूवार दि.17 ऑगस्ट 2023 रोजी कोतवाल पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी जाहिरनामा प्रसिध्द, 18 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून 2 सप्टेंबरला छाननी, 4 सप्टेंबरला पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द, 4 ते 6 सप्टेंबरपर्यंत आक्षेप घेण्यासाठी मुदत, 8 सप्टेंबर रोजी पात्र व अपात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करणे, 8 ते 11 प्रवेश पत्र उपलब्ध करून देणे, 13 सप्टेंबररोजी लेखी परिक्षा आणि 14 सप्टेंबररोजी निवड यादी व प्रतिक्षा सुची प्रसिध्द करणे असा कार्यक्रम जाहिर झाला आहे.
यानुसार पोलादपूर तहसिलदार कार्यालयामध्ये महाड उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आरक्षण सोडतीमध्ये तहसिलदार कपिल घोरपडे, मुख्याधिकारी पोलादपूर, मंडळअधिकारी व तलाठी सजा सर्व, ग्रामसेवक सर्व मार्फत गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सहभागी व्हायचे असून गुरूवार, 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता या आरक्षण सोडतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील शिपाई पदासाठी सावळागोंधळ झाल्याची माहिती प्राप्त झाली असून कापडे खुर्द ग्रुपग्रामपंचायतीमध्ये नोटीस बोर्डावर 9 ऑगस्ट रोजी पर्यंत भरतीसंदर्भात अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये उमेदवार हा गावाचा स्थानिक रहिवासी असावा, शाळा सोडल्याचा दाखला मूळ सत्यप्रतीत असावा, शिपाईपदाकरीता किमान 12वी पर्यंत शिक्षण अपेक्षित आहे. संगणकज्ञान असल्याचे प्रमाणपत्र असावे, शिपाई पदाकरिता वय किमान 18 ते 35 असावे, उमेदवार शारिरीकदृष्टया सक्षम असावा, उमेदवाराविरूध्द कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा, उमेदवाराच्या उच्चतम शिक्षणाचा विचार केला जाईल, उमेदवाराच्या प्राप्त अर्जापैकी कोणताही अर्ज मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार खाली सही करणाऱ्या ग्रामसेविका आणि सरपंच यांनी राखून ठेवला असून कोणत्याही प्रकारे अपिल करता येणार नाही. निवड झालेल्या उमेदवाराने सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ग्रामपंचायतीचे दैनंदिन तसेच सरपंच, ग्रामसेवक व वरिष्ठ यांनी नेमून दिलेली कामे करावी लागतील, असे नमूद करण्यात आले होते.