मानसिक, शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप
| महाड | प्रतिनिधी |
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या रायगड पोलीस दलातच सुरक्षेबाबत खळबळ उडाली आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस निरीक्षकाला वरिष्ठांसह सहाय्यकांकडून मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या जाचाला कंटाळून पोलीस निरीक्षकांनी पोलीस महासंचालक यांना पत्र पाठवून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
रायगड पोलीस दलात कार्यरत असणारे महाड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रमेश तडवी हे यापूर्वी ठाणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. त्यांची 2024 मध्ये लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत रायगड जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. सुरुवातीला ते अलिबागमध्ये रायगड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली अलिबागमधून महाड शहर येथे करण्यात आली. प्रभारी अधिकारी म्हणून महाड शहराचा कारभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला. सुरुवातीच्या कालावधीत सर्व कारभार चांगल्या पध्दतीने चालत असताना राजकीय दबावापोटी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास देण्यास सुरुवात करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जातीवाचक विधान करण्याबरोबरच हीन वागणूक दिली असल्याचा आरोप पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी केला आहे. महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे या वरिष्ठांनी पोलीस अधिक्षकांकडे कर्तव्यात कसूर केल्याचा खोटा अहवालही दिला गेला. अपर पोलीस अधीक्षकांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मिलींद खोपडे यांच्या मनाप्रमाणे काम न केल्याने बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन वर्षात दोनदा बदलीमुळे व्यथित झालेल्या तडवी यांनी वरिष्ठांकडून जातीवाचक टोमणे, हीन वागणूक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कुटूंबियासह आत्महत्या करणार असल्याचा इशारा तडवी यांनी दिला आहे. याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहीले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
महाड शहर पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारल्यापासून उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, सपोनि जीवन हिंदूराम माने यांनी त्रास द्यायला सुरू केल्याचा आरोप रमेश तडवी यांनी केला आहे. वरिष्ठांनी एकट्याला केबिनमध्ये बोलावून तु खालच्या जातीचा आहे, तु कसा येथे राहतो तेच बघतो, काही झाले तरी मी तुझी बदली करणारच अशी धमकी दिली. तसेच जिवन हिंदूराव माने, जाणीवपूर्वक बाहेर लोकांना माझ्या जातीवरून बोलून माझा अपमान करीत होते, असा आरोप तडवी यांनी पत्रातून स्पष्ट केला आहे.
रायगड जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस ठाण्यातील प्रभार अधिकारी यांचा मानसिक व शारीरीक छळ होत असल्याने पोलीस दलातील कर्मचारी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्याचा कारभार हाती घेतल्यावर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यावर भर दिला. वादग्रस्त अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याबरोबरच अनेकांच्या अन्य ठिकाणी बदल्या केल्या. एक वेगळा दबदबा त्यांचा जिल्ह्यात आहे. मात्र महाड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी यांच्यावर होत असलेल्या अन्यायबाबत ते काय भुमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
आ. गोगावलेंच्या आरोपी पुत्राला पोलिसांचे सहकार्य?
महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात झालेल्या भांडणावरून दोन गुन्हे दाखल झाले होते. एका गुन्ह्यात मंत्री भारत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आरोपी होता. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी अपर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरिक्षक मिलिंद खोपडे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बनाव करून तीन जणांना बेकायदेशीररीत्या अटक करण्यास सांगितले होते, असा आरोप रमेश तडवी यांनी केला आहे. मात्र, बेकायदेशीर अटक करण्यास नकार दिल्याने आपल्याला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पोलीस अधीक्षकांनी बोलणे टाळले
महाड शहर पोलीस ठाण्यातील तडवी यांच्यावर वरिष्ठांकडून छळ होत असल्याच्या प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, 'ज्यांनी जे सांगितले आहे, त्यांना विचारा', असे सांगून बोलणे टाळले.





