मृत मुलीच्या नातेवाईकांचा आरोप
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग सरकारी रुग्णालयात उपचार घेत असताना एका 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यू पोलीस दलात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यामुळेच झाल्याचा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
रायगड पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हे माणगाव तालुक्यातील वारक येथील रहिवासी आहेत. त्यांच्या गावातील एक गरीब घराण्यातील मुलीला काम देण्याच्या निमित्ताने त्यांच्या रोहा येथील घरी आणले. गेल्या अनेक वर्षांपासून ती त्या ठिकाणी राहात होती. तिच्या गरिबीचा फायदा घेत तिच्याशी त्याने अनैतिक संबंध ठेवले. काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडली. रोहा येथील दवाखान्यात त्या हवालदाराने तिला उपचारासाठी दाखल केले. अधिक उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात त्याने तिला आणले. उपचार घेत असताना तिचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच वडील रुग्णालयात आले. परंतु, त्या ठिकाणाहून पोलीस हवालदार गायब झाले. आपल्या मुलीच्या मृत्यूला हा पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप ठेवत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास काही वेळ पालकांनी नकार दिला. संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
मुलीचे लग्न न होण्यास कारणीभूत
मुलीला घरकाम करण्यासाठी पोलिसाने त्याच्या घरी नेले. काही वर्षांपासून ती त्याच्याकडे राहात होती. तिचे लग्न ठरले होते. त्यामुळे ती पुन्हा माणगाव येथील घरी आली. परंतु मुलगा चांगला नाही, असे सांगून पुन्हा तिला त्याने त्याच्या घरी आणले. तिच्या मृत्यूस तोच जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
पोलिसाने मुलगी मयत झाल्याची माहिती फोनवर दिली. त्यानुसार मी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात संध्याकाळी आलो. मात्र, तो पोलीस त्या ठिकाणी नव्हता. तोच माझ्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत आहे.
मृत मुलीचे पालक