| खोपोली | प्रतिनिधी |
मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी खोपोली, शिळफाटा शहरात पोलिसांनी रुटमार्च केला. लोकसभेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासंबंधीचे अवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले. मावळ लोकसभेची निवडणूक 13 मे रोजी जाहीर झाली आहे. शांतता सुव्यस्था कायम राहावी राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत व्हावी या उद्देशाने खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरिक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्च काढण्यात आला. सकाळी 10 वाजता खालची खोपोली अग्निशमन दलाच्या मैदानावरून पथसंचलनास प्रारंभ करण्यात आला.खोपोली बाजारपेठ, शास्त्रीनगर, पाटणकर चौक, समाजमंदीर रोड नंतर शिळफाटा बाजारपेठ, गणेश नगर, पटेलनगरनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर समारोप करण्यात आला.
याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजित गडदे, कर्मराज गावडे, उप पोलीस निरिक्षक सुधाकर लहाने, अलोक किस्मतराव, अभिजीत व्हरंबले, पूजा चव्हाण, गोपनीय विभागाचे प्रदीप खरात, सतीष बांगर, पोलीस हवालदार सागर शेवते, प्रसाद पाटील यांच्यासह सीमा सुरक्षा दल 47 जवान आणि खोपोली ठाण्यातील 37 पोलीस अमंलदार उपस्थित होते.
खोपोलीत पोलिसांचा रूट मार्च
