। उरण । वार्ताहर ।
करंजा ते उरण चारफाटा या रस्त्याचे डांबरीकरण सुरू असून, ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यापूर्वीही या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही महिन्यांतच रस्ता खराब झाला होता. त्यामुळे यावेळी ठेकेदारावर कारवाई करून कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी चाणजे ग्रामस्थांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. मात्र, ठेकेदाराने कोणतीही खोदाई न करता थेट डांबर टाकण्यास सुरुवात केली आहे. वापरण्यात येणारे साहित्यही निकृष्ट दर्जाचे असल्याने कामाचे आयुष्यमान अत्यंत कमी राहणार आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी साचून लवकरच खड्डे पडण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, रस्त्यावर डांबराच्या तुलनेत ऑईलचा जास्त वापर होत असल्याने डांबरीकरण लवकरच निघून जाण्याची भीती आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.