। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वासाठी बीसीसीआयने रिटेन्शन नियम जाहीर केले आहेत. यात सहा खेळाडूंना संघात कायम राखण्याची परवानगी सर्व फ्रँचायझींना मिळाली आहे. पण, त्यात एक अनकॅप्ड खेळाडू असायला हवा आणि यामुळे सहा खेळाडू रिटेन केल्यास फ्रँचायझीच्या पर्समधून 79 कोटी रुपये वजा होतील. आता खेळाडूंना कायम ठेवा अन् पैसेही वाचवा अशा गणितांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. यात लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधाराच्या भवितव्याची चर्चा रंगली असून अशातच एक फलंदाज टी-20 मैदान गाजवून त्याच्या कर्णधारपदाला आव्हान देत आहे.
कॅरेबियन प्रीमिअर लीग 2024 मध्ये त्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळणार्या निकोलस पूरनचा फॉर्म हा वेगळ्याच उंचीवर सुरू आहे. त्याने रविवारी गयाना अॅमेझॉन वॉरियर्सच्या गोलंदाजांची धुलाई करून शतक झळकावले आहे. जेसन रॉय आणि पूरन यांनी 152 धावांची सर्वोत्तम भागीदारी केली आहे. रॉय 26 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 34 धावांवर बाद झाला. पूरनने मोर्चा सांभाळताना 59 चेंडूंत 9 चौकार व 8 षटकारांसह 101 धावांची खेळी केली.
लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2024 मध्ये निकोलस पूरनसाठी 16 कोटी रुपये मोजले होते. त्याने आयपीएलचा हे पर्व गाजवले आणि आता केएल राहूलच्या जागी त्याला कर्णधार करतील अशी चर्चा सुरू आहे.