। नाशिक । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ने 2024-25 हंगामासाठी महाराष्ट्र संघाची घोषणा केली आहे. राज्याच्या संघात नाशिकच्या सत्यजित बच्छाव, मुर्तुझा ट्रंकवाला यांना स्थान मिळाले आहे, तसेच मुळचा नाशिककर असलेला रामकृष्ण घोष याचीही संघात निवड झाली आहे.
डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव व सलामीचा फलंदाज मुर्तुझा ट्रंकवाला अनुभवी रणजीपटू आहेत. रामकृष्णने मागील हंगामात रणजित पदार्पण केले. सत्यजितने महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. सत्यजित यंदाच्या महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बळी घेत उत्कृष्ट गोलंदाज सन्मान ‘पर्पल कॅप’चा मानकरी ठरला होता. त्याने एकूण 25 बळी टिपले होते. मुर्तुझा सलामीचा फलंदाज असून, महाराष्ट्र संघातर्फे बीसीसीआयच्या रणजी चषक स्पर्धेत 2023-24 च्या हंगामात त्याचे दमदार पुनरागमन झाले होते. संधी मिळताच विदर्भ विरुद्ध दुसर्या डावात मुर्तुझाने 126 चेंडूत 15 चौकारांसह 86 धावा केल्या होत्या. 2017 ला मुर्तुझाचा महाराष्ट्र रणजी संघामध्ये पहिल्यांदा समावेश झाला होता. त्यावेळी पहिल्याच रणजी सामन्यामध्ये मुर्तुझाने शतक झळकविले होते.
सत्यजित, मुर्तुझा व रामकृष्ण घोष यांच्या निवडीबद्दल जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे व पदाधिकार्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.