। मुंबई । प्रतिनिधी ।
सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे. आज बुधवार दि.15 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती होती. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावर काही अंशी त्यांनी मात केली होती, पण आता तो आजार पुन्हा बळावला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधानंन सिनेइडंस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज धीर यांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं, परंतु त्यांनी त्यावर मात केली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी तो पुन्हा बळावला आणि त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांनी यासाठी मोठी शस्त्रक्रिया देखील केली होती. पंकज धीर यांनी बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या प्रसिद्ध मालिकेत कर्णाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. पंकज धीर यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. पंकज धीर यांनी अनेक मालिका,सिनेमात भूमिका साकारल्या होत्या, पण महाभारतात त्यांनी साकारलेली कर्णाची भूमिका प्रचंड गाजली.







