कम्युनिटी पोलिसिंगचा सकारात्मक परिणाम

6916 मुले-मुली, महिलांना मार्गदर्शन

| रायगड | खास प्रतिनिधी |

कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत रायगड पोलीस दलामार्फत बडी कॉप, ज्येष्ठ नागरिक, पोलीस काका, पोलीस दीदी, जागरुक नागरिक अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्यानुसार समाजातील 6916 मुले, मुली आणि महिला यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्यास मोलाचा हातभार लाभल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र पोलिसांनी पोलिसिंगच्या कामात जनतेला सहभागी करून घेण्यासाठी अनेक उपक्रमांना संस्थात्मक स्वरूप दिले आहे. शहरीकरण व औद्योगिकीकरणाच्या वाढत्या वेगामुळे महाराष्ट्राची लोकसंख्या शास्त्रीय रचना गेल्या दोन दशकांत कमालीची बदलली आहे. अर्थात, पोलिसिंगची पद्धत ग्रामीण व शहरी भागात बरीच वेगळी आहे. सुरक्षा व सुरक्षितता यांच्या निश्‍चितीसाठी पोलिसांसोबत जनतेनेही सक्रियपणे काम करणे, हा समुदाय पोलिसिंग अर्थात कम्युनिटी पोलिसिंगच्या संकल्पनेचा पाया आहे.

सार्वजनिक व्यवस्था राखण्याच्या तसेच समाज गुन्हेमुक्त राखण्याच्या प्रक्रियेत समुदायातील सदस्यांना सहभागी करून घेतले नाही, तर पोलीस यंत्रणांना त्यांची कर्तव्ये निभावणे कठीण होईल. हा दृष्टिकोन ठेवून मोहल्ला एकता समिती किंवा ग्रामसुरक्षा दल यांसारखे उपक्रम ग्रामीण व शहरी भागात हाती घेण्यात आले. ग्रामसुरक्षा दले ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी गस्त घालतात आणि मालमत्तेसंदर्भातील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना मदत करतात. मोहल्ला एकता समित्या विविध क्षेत्रांतील लोकांच्या सहभागातून सांप्रदायिक सौहार्द राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलीस ठाण्यांतर्गत 245 बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सहा ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यात आली आहे. पोलीस काका, पोलीस दीदी यांनी जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयांना 1077 भेटी दिल्या आहेत. तसेच 407 जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. त्यामुळे सदर विद्यार्थी, विद्यार्थिनींमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे.

जागरुक नागरिक कक्षामार्फत 210 गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भेटी देण्यात आल्या आहेत. तसेच शाळा-महाविद्यालय-407, मॉल-मल्टीप्लेक्स-9, हॉस्पिटल-101, सरकारी कार्यालय-100 यांचा समावेश आहे. बडी कॉप यांनी पोलीस ठाणे स्तरावर 236 बैठका घेण्यात आल्या आहेत. समुदाय पोलिसिंग ही संकल्पना अत्यंत प्रभावी असून, आज संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात विविध पातळीवर भरीव काम समुदाय पोलिसिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. समुदाय पोलिसिंग या संकल्पनेचे प्रभावी कार्य मांडताना गडचिरोली पोलीस दलाचा विशेष उल्लेख करावा लागेल. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व दुर्गम भागात समुदायात जाऊन आरोग्य शिबिरे, ग्रामभेट, ग्रंथालय व अभ्यासिकांची निर्मिती, विविध शासकीय दाखले वाटप शिबिरे, शासकीय योजनांची लाभार्थींपर्यंत माहिती पोहोचविणे, रोजगार मार्गदर्शन मेळावे, शालेय मुलांसाठी महाराष्ट्र दर्शन सहली आयोजित करणे इत्यादी अनेक उपक्रमांद्वारे समाजातील अनेकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य समुदाय पोलिसिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Exit mobile version