| पाली-सुधागड | वार्ताहर |
पाली, सुधागड तालुका हा वनसंपदेने नटलेला असल्याने शहराकडील तसेच परप्रांतीयांना भुरळ घालत आहे. नैसर्गिक दृष्ठ्या संपंन्न असलेल्या सुधागड तालुक्यात मुंबई पुणे ठाणे तसेच इतर राज्यातील विकासक येऊन फार्महाऊस, बंगले, रिसॉर्ट बांधून खरेदी विक्री चा व्यवसाय जोरदार करीत आहेत. या विकासित केलेल्या भागाची अथवा जागेची किंवा प्रोजेक्ट ची जाहिरात रस्त्यालगत मोठं मोठे जाहिरातीचे बॅनर, फ्लेक्स उभे करून करीत आहेत. परंतु रस्त्यालगत असलेले बॅनर, जाहिरातीसाठी केलेली बांधकामे ही अपघातांना जणू काही आमंत्रणच देत आहेत.
अशाच प्रकारचे अपघातांना आमंत्रण देणारे बांधकाम एका व्यावसायिकाने स्वतःच्या फायद्याकरिता खुरावले फाटा याठिकाणी पाली खोपोली राज्यमहामार्गालगत केले आहे. खुरावले फाट्यावरून भेरव, वाघोशी,कवेळे, महागाव, चंदरगाव, ताडगाव, पेण तसेच इतरही अनेक गावांना जाता येते. दिवसभरात हजारो वाहने या मार्गावरून महागाव च्या दिशेने जात असतात.परंतु ‘नाव्या’ हे नाव असलेल्या प्रोजेक्ट ची जाहिरात करण्यासाठी विकासकाने रस्त्यालगत बांधकाम केले आहे. या बांधकांमुळे वाघोशी च्या दिशेने आलेल्या किंवा पाली कडून वाघोशीच्या दिशेने जात असलेल्या वाहनांना पुढचे काहीच दिसत नाही परिणामी बऱ्याचदा अशा वाहनांना अपघातांचा सामना करावा लागतो आहे. तसेच मोठ्या वाहनांना वळण घेताना पुढचं दिसण्यात येत नाही.
याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांच्या निदर्शनास वारंवार आणून देऊन देखील त्यांच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. तसेच स्थानिक प्रशासन देखील याकडे कानाडोळा करीत असल्याचेच दिसून येत आहे. सदर च्या बांधकामाला स्थानिक ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगी कशी व का? दिली याबाबत देखील नागरिकांमधून चर्चा केली जात आहे. सदरील ‘नाव्या’ नावाने केलेले बांधकाम हे अपघाती क्षेत्र बनले असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात घडण्याची दाट शक्यता असल्याने ते तोडण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
खुरावले फाट्यावरील बांधकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. शिवाय सदरचे बांधकाम करीत असताना त्याठिकाणी एसटी बस थांबा होत असल्याचे भासवून लोकांची दिशाभूल केली आहे. एमएसआरडिसी चे अभियंता व स्थानिक प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनास आणून देखील याबाबत उदासीनता दिसून येत आहे.
निवास सोनावळे,(पत्रकार)