रस्ता दुरुस्तीसाठी शिवसेना (उबाठा) तर्फे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारींना निवेदन
। पाली/वाघोशी । प्रतिनिधी ।
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाली शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शिवसेना (उबाठा) तर्फे विद्देश आचार्य यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
29 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत पाली व खेडोपाड्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री बल्लाळेश्वर मंदिरातही देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येणार असल्याने शहरातील रस्त्यांची दुरवस्था चिंतेचा विषय ठरत आहे. पोलीस स्टेशन ते गणपती मंदिर, हटाळेश्वर चौक, विक्रम स्टँड तसेच पालीतील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या खड्ड्यांमुळे गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून पावसामुळे खड्डे खोल होऊन गंभीर अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. वाहनांचे नुकसान तर होतच आहे, मात्र पादचाऱ्यांच्या जीवितासही धोका संभवतो. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
