ई- रिक्षा चार्जिंग अभावी बंद; विद्यार्थी, नागरिकांचे हाल
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या पर्यटनस्थळी मागील आठवड्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्याचा परिणाम माथेरानमधील पर्यावरण पूरक ई-रिक्षा यांच्या चार्जिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान विजेच्या लपंडावामुळे माथेरानमध्ये बहुसंख्य ई-रिक्षा वाहतूक करण्यासाठी कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे माथेरानचे पावसाळी पर्यटन बहरून आला आहे, असे असताना विजेच्या लपंडावामुळे शहराची वाहतूक व्यवस्था पाहणाऱ्या बहूसंख्य ई-रिक्षांच्या चार्जिंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज खंडित असल्याने चार्जिंग नाही आणि त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, स्थानक नागरिक आणि पर्यटकांना सेवा देण्यास विलंब होत आहे. माथेरानचे पर्यटन वाढीस पर्यावरण पूरक ई-रिक्षा देखील महत्वाचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चार्जिंग अभावी वीज खंडित झाल्यास त्याचा मोठा फटका पर्यटकांच्या वाहतुकीस होत आहे. ही बाब लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी ई-रिक्षांच्या चार्जिंगसाठी जनरेटर खरेदी करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
माथेरान नगरपरिषदेने असा जनरेटर खरेदी करावा आणि किमान दोन चार्जिंग पॉईंट उपल्ब्ध करून द्यावेत अशी देखील मागणी केली आहे. तर बायोगॅस प्रकल्प येथे असलेला जनरेटर सुस्थितीत करून रस्त्यावरील पथदिवे बायोगॅस वर सुरू करावेत आणि तो जनरेटर ई-रिक्षाचार्जिंगसाठी उपयोगात आणला जाऊ शकतो असे मत आणि सूचना प्रेरणा सावंत यांनी केली आहे. दरम्यान, सावंत यांनी ई-रिक्षांसाठी श्रमिक रिक्षा संघटना यांनी जनरेटर खरेदी करावा अशी मागणी केली आहे.
जनरेटर घेण्याबाबत संघटनेचा विचार आहे. मात्र, किती मोठा जनरेटर घ्यावा यावर एकमत होत नाही. परंतु ,सेवा देण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल. मात्र, वीज पुरवठा बाबत महावितरणाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने वीज पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुनील शिंदे सचिव
श्रमिक रिक्षा संघटना







