| बंगळुरू | वृत्तसंस्था |
अत्याचार आणि लैंगिक छळ प्रकरणात हासन मतदारसंघाचा खासदार आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा याला अटक करण्यात आली. गुरूवारी मध्यरात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्याला जर्मनीतील म्युनिक येथून बंगळुरू विमानतळावर पोहोचताच अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
प्रज्वल रेवण्णा याच्यावर 27 एप्रिल रोजी लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर तो परदेशात पळून गेला होता. अखेर शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली. विशेष तपास पथकाने (एसआयटी) सकाळी बंगळुरू येथील सीआयडी कार्यालयात त्याची प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर बोअरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रज्वल रेवण्णा याने आपल्या निरंकुश सत्तेचा वापर करून सुमारे 400 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. त्यात कर्नाटक प्रशासनातील महिला अधिकारी, नेत्यांच्या पत्नी आणि त्याच्याच पक्षातील महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. सुरुवातीपासूनच स्त्रीलंपट अशी प्रतिमा असलेल्या प्रज्वलने 400 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. 400 पैकी 90 महिला या अधिकारी, नेत्यांच्या बायका किंवा निधर्मी जनता दलाच्या कार्यकर्त्या आहेत. प्रज्वलने महिलांचे लैंगिक शोषण करत असताना स्वतःच त्या कृत्यांचे मोबाईलवर व्हिडीओ चित्रणही केले आहे. त्यावर कळस म्हणजे त्या व्हिडीओ चित्रणाची भीती दाखवून त्याने त्या महिलांना वारंवार आपल्या वासनेची शिकार बनवले आहे, असे तपासातून पुढे येत आहे.