| पनवेल | प्रतिनिधी |
पावसाळ्याला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेने खारघर सेक्टर 12 मधील मुख्य नाल्याच्या साफसफाईचे काम सुरू केल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.
खारघरमधील पांडवकडा धबधबा डोंगरावरून पावसाचे पाणी हे खारघर सेक्टर सहामधून सेक्टर 12 वसाहतीमधून खाडीत वाहून जाते. पावसाळ्यात खारघर डोंगरावर मुसळधार पाऊस झाल्यास सेक्टर 12 मधील नाला दुथडी भरून वाहत असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची साफसफाई करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, हा नाला सेक्टर 12 मधील वसाहतीच्या मध्यभागी आहे. पालिकेकडून राबविल्या जाणार्या स्वच्छता अभियानाच्या वेळी नागरिकांनी घरातील कचरा पालिकेच्या घंटागाडीत टाकावा, याविषयी आवाहन करूनही बहुतांश नागरिक याकडे दुर्लक्ष करून नाल्यात कचरा टाकत असल्यामुळे नाला कचरामय झाला आहे. पालिकेकडून जेसीबी लावून या नाल्यातील कचरा आणि वाहून आलेली माती साफसफाई केली जात आहे. नालेसफाई करताना रस्ते आणि पदपथावर मातीचे ढिगारे राहणार नाहीत, याची काळजी पालिका घेत असल्याचे खारघरचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी सांगितले.
प्लॅस्टिक आणि पानवेलींचे जाळे
खारघरमधील सर्व नाल्यात पानवेली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच झाडे-झुडपे आणि प्लॅस्टिक कचरा नाल्यात पडून आहे. आओचे आणि खारघर डोंगरावरील पावसाचे पाणी या नाल्यातून खाडीत वाहून जात असते. पावसाळ्यात हे नाले दुथडी भरून वाहतात. पालिकेने सेक्टर 12प्रमाणे खारघर वसाहतीमधून खाडीत जाणार्या इतर नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी खारघरवासीयांकडून केली जात आहे.
काढलेला गाळ तात्काळ उचलावा!
खारघर सेक्टर 12 मधील नालेसफाईचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. जेसीबीच्या मदतीने नाल्याची साफसफाई करताना नाल्यात साचलेला कचरा आणि माती एका बाजूला केली जात आहे. पालिकेने जमा झालेला कचरा तत्काळ बाहेर काढणे आवश्यक आहे. खारघर डोंगरावर मुसळधार पाऊस पडल्यास नाल्यातील कचरा पुन्हा नाल्यात अडकून नाला जैसे थे होऊ शकतो. पालिकेने याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.