प्रीतम म्हात्रे स्थानिकांच्या मागणीसाठी आक्रमक
| उरण । वार्ताहर ।
सिडकोने शहरे वसवली परंतु गावठाणामधील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली वाढीव बांधकामे कायम करण्यासंदर्भात निर्णय सिडकोने घेतलेला नाही. सिडकोच्या माध्यमातून ही बांधकामे तोडण्यासाठी नियमाच्या विरुद्ध अनेक वेळा कार्यवाही केली जाते. 17 जानेवारी रोजी अशाच प्रकारे गव्हाण ग्रामपंचायत विभागात सिडकोने कार्यवाही केली. त्याची माहिती मिळताच शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी सिडको प्रशासनाविरुद्ध नागरिकांच्या बाजूने रस्त्यावर उतरत त्या कारवाईला विरोध केला आणि थांबवण्यास भाग पाडले. प्रीतम म्हात्रे यांनी पोकलेनवर चढत या कारवाईला विरोध केला. वाढीव बांधकाम नियमानुसार परवानगी देऊन कायम करण्यासाठी लवकरच बैठक बोलवून निर्णय घेण्यात येईल. स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष म्हणून नेहमी सोबत आहे.
शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी घेतलेल्या तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमुळे गव्हाण येथे तोडक कारवाईसाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला माघारी फिरावे लागले. उलवे नोड परिसरातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी बांधलेल्या बांधकामांवर शुक्रवारी सिडकोचे अतिक्रमण विभाग पोलीस फौजफाट्यासह कारवाईचा बडगा उचलण्यासाठी गव्हाण गावात पोहचले होते. याची माहिती प्रितम म्हात्रे यांना मिळताच ते प्रकल्पग्रस्त शेतकर्यांसोबत गव्हाण गावात पोहचले आणि सिडकोने सुरू केलेली तोडक कारवाई थांबवली. सिडको जो पर्यंत्त तोडक कारवाई थांबवत नाही तो पर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
गव्हाण येथील सिडकोच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या पक्क्या दुमजली इमारतींवर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाने पोलिस बंदोबस्तात तोडक कारवाईला सुरुवात केली आहे. सिडको, पोलिस व ग्रामस्थांमध्ये उफाळून आलेल्या संघर्षामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्हाण ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या व सिडकोच्या जागेत अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या तीन दुमजली इमारतींवर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे अधिकारी भारत ठाकूर यांनी शुक्रवारी (17) सकाळपासूनच सुरुवात केली होती. मोठा पोलिस फाटा, चार जेसीबी, शेकडो सुरक्षा कर्मचारी यांच्या बंदोबस्तात सिडकोने तोडक कारवाईला सुरुवात केली. तीनपैकी दोन पक्क्या इमारतींवर कारवाई सुरू असतानाच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शेकापच्या माध्यमातून कारवाईला प्रखर विरोध केला.