| वसई | प्रतिनिधी |
भरधाव वेगाने जाणार्या खासगी ट्रॅव्हल्स वाहनाने एका दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (दि.17) संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास विरार पूर्वेच्या मनवेल पाडा येथे हा अपघात झाला.
सचिन तांबे (40) आणि राजश्री तांबे (36) हे दांपत्य विरार पूर्वेच्या मनवेल पाडामधील चेतन अपार्टमेंट मध्ये राहतात. त्यांना 2 मुली आहेत. सोमवारी दुपारी 4 च्या सुमारास पती पत्नी शाळेतून मुलींना आणण्यासाठी आपल्या दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी मनवेल पाडा येथील डिमार्ट समोरून भरधाव वेगाने जाणार्या खासगी ट्रॅव्हल्स वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील राजश्री तांबे यांचा जागीच मृत्यू झाला तर, सचिन तांबे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पोलिसांनी आरोपी वाहनचालक विजय साळवी (33) याला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.