भूमिका संशयास्पद, जबाबदारी घेण्यास टाळाटाळ
| नेरळ | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा वरवणे येथील चौथीमध्ये शिकणार्या विद्यार्थिनीचा शाळेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेला दहा दिवस झाल्यानंतरदेखील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई शासकीय आश्रमशाळा तसेच आरोग्य विभागावर करण्यात आलेली नाही. दरम्यान, प्रकल्प अधिकार्यांची भूमिका खुशबू ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. त्यात माध्यम प्रतिनिधी यांच्यासमोर तोंडावर आपल्या हातातील फाईल लावून चेहरा लपविण्याचा प्रयत्न प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केला आहे.
पेण तालुक्यातील तांबडी गावातील आदिवासी नऊ वर्षांची मुलगी तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकत होती. तेथील आश्रमशाळेत 16 डिसेंबर रोजी झालेल्या कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या हिवताव कुष्ठरोग निर्मूलन पथक यांनी चौथीमध्ये शिकणारी खुशबूला कुष्ठरोगी ठरवले होते. त्यानंतर कुष्ठरोगावरील गोळ्या घेतल्यावर खुशबूच्या अंगावर फोडी आल्या आणि नंतर ताप तसेच अंग सुजू लागल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेथे उपचार सुरु करण्याआधी कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोळ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता.
खुशबूला त्यापूर्वी कोणताही आजार नव्हता आणि तसे असताना खुशबूला कुष्ठरोगी ठरवून तिला गोळ्या देण्यात आल्या आणि त्याचा परिणाम तिच्या अंगावर फोड्या तसेच अंग सुजू लागल्याने चुकीचे निदान केल्याने तिचा बळी गेला आहे. त्यानंतर आदिवासी विभागाच्या अंतर्गत चालणार्या आश्रमशाळा यांच्या हलगर्जीपणाबद्दल प्रकल्प अधिकारी कार्यालयाने आश्रमशाळा प्रशासनाला केवळ करणे दाखवा नोटीस बजावली. कोणतीही कारणे दाखवा नोटीसची मुदत ही तीन दिवसांची असते. त्या नोटिसीला आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांनी अद्याप खुलासा दिलेला नाही. तीन दिवसांत कारणे दाखवा नोटीसीला उत्तर देण्यात आले नाही याची पूर्वकल्पना प्रकल्प अधिकारी कार्यालयात असतानादेखील पुढील कारवाई प्रस्तावित केलेली नाही.
तसेच त्या मुलीला कुष्ठरोगी घोषित करणार्या आरोग्य विभागाकडून कोणतीही आदिवासी विकास विभागाकडे नाही. त्याचवेळी प्रकल्प अधिकारी आत्मराम धाबे हे केवळ शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक आणि अधीक्षिका यांना कारणे दाखवा नोटीस देण्याच्या पुढे गेलेले नाहीत. दहा दिवसांत प्रकल्प अधिकारी यांच्याकडून आरोग्य विभाग आणि शासकीय आश्रमशाळा यांच्याकडून झालेल्या प्रकाराबाबद्दल आपल्या वरिष्ठ कार्यालयाला अहवालदेखील सादर करू शकले नाहीत. त्यामुळे खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांच्याकडून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे काम झालेले नाही. दरम्यान, हे सर्व प्रकरण घडून दहा दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरदेखील आदिवासी विकास विभाग यांच्याकडून दोषींवर कारवाई करण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी आदिवासी विकास विभाग आणि आरोग्य विभागावर कारवाई व्हावी, अशी मागणी खुशबूच्या आईने केली आहे.
फायलींच्या मागे लपवले तोंड
प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्या कार्यालयात भेटण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयाच्या बाहेर पडताना माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे बघून प्रकल्प अधिकारी धाबे हे जलदगतीने आपल्या खासगी गाडीत बसले. त्यानंतरदेखील गाडीमध्ये बसलेलं प्रकल्प अधिकारी यांनी आपला चेहरा कॅमेर्यात येऊ नये यासाठीदेखील खबरदारी घेतली आणि आपल्या चेहर्यासमोर आपल्या हातातील फाईल घेऊन चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे माध्यमांना माहिती देण्याचे प्रकल्प अधिकारी टाळत असल्याचे दिसून येत आहे.