कृषी विभागाकडून सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन

शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

| तळा | वार्ताहर |

शेतीमध्ये सातत्याने होत असलेला रसायनांचा अतिरिक्त अधिकचा वापर त्यामुळे खालावलेला जमिनीचा पोत, तसेच रासायनिक किटकनाशकाच्या फवारणीचे मानवी आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम याला पर्याय म्हणून सेंद्रिय व जैविक शेतीस चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन या योजनेची सुरुवात तळा तालुक्यात करण्यात आली आहे. या योजनेचा कालावधी चार वर्षांचा असणार आहे. ही योजना राज्यशासनाची महत्वकांक्षी योजना असल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र सेंद्रिय शेती मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. यासाठी कृषी विभाग वेगवेगळ्या योजनांची मदत शेतकऱ्यांना करणार आहे. त्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी केले आहे.

योजनेचा उद्देश
पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, मोठ्या क्षेत्रावरचे प्रमाणीकरण व कृषी विकास योजनेतून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतीमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येईल. यामुळे रसायन अवशेषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होईल.
 सेंद्रिय शेतीसाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पिकांचे अवशेष वापरून शेतातच सेंद्रिय शेती निविष्ठा तयार करण्याची प्रणाली विकसित करणे, तिचा इतरत्र प्रसार करणे, शेतकऱ्यांना दर्जेदार सेंद्रिय निविष्ठा योग्य पद्धतीने वापरण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करणे, सेंद्रिय शेतमालाच्या वितरणासाठी बाजारपेठ आणि स्वतंत्र विक्री व्यवस्था निर्माण करणे, सेंद्रिय शेतीमालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे, सहभाग हमी पद्धतीने सेंद्रिय शेतीचे गट प्रमाणीकरण करून घेणे आदी या योजनेची उद्दिष्टे असतील. या योजनेत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपनीची देखील नोंदणी करण्यात येईल.
अशी राबविली जाईल योजना
एकाच गावात किमान 20 शेतकऱ्यांचा 50 हेक्टरचा एक गट या प्रमाणे गट करावा लागेल. एका मंडळात 10 गटांची नोंदणी करावी लागेल. त्यासाठी एक गट प्रवर्तक, गट मार्गदर्शक व तज्ज्ञ प्रशिक्षकाची निवड केली जाईल. एका शेतकऱ्यांना कमाल 2 हेक्टरपर्यंत लाभ दिला जाईल. सहभागी शेतकऱ्यांना लागवड ते काढणीपर्यंत किमान 3 प्रशिक्षणे दिली जातील.

सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा कशा तयार कराव्यात, याबाबत प्रशिक्षण दिले जाईल. शेतीचे प्रामाणीकरण करून शेतीमालाचे ब्रँडिंग केले जाईल. सहभागासाठी तालुका स्तरावरील तालुका कृषी अधिकारी व आत्माच्या तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version