नागावच्या सरपंचाची तत्परता

उधाणाचे खारे पाणी शेतात घुसण्यापासून रोखले

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात गुरुवारी (दि.18) रात्री समुद्राला मोठे उधाण आले असताना खारे पाणी शेतजमिनीत घुसण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या मदतीने पाण्याचा मार्ग रोखण्याची उपाययोजना केली. त्यामुळे सुमारे दहा एकर शेतीमध्ये खारे पाणी जाण्यापासून बचाव झाला असून, संभाव्य नापिकीचे संकट टळले. त्यांच्या या तत्परतेबद्दल शेतकरी आणि ग्रामस्थांकडून कौतुक व्यक्त केले जात आहे.

रायगड जिल्ह्यात 14 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 24 दिवस समुद्राला मोठे उधाण येणार असून, साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा उसळण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला होता. त्यानुसार गुरुवारी (दि. 18) रात्री सुमारे आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान समुद्राला मोठे उधाण आले. किनारपट्टी भागात उंच लाटा उसळू लागल्या आणि नागावमधील चिंतामणी गल्ली तसेच पाटील गल्ली परिसरातील शेतजमिनी धोक्याच्या छायेत आल्या. या परिसरातील सुमारे दहा एकर शेतजमिनीकडे जाणाऱ्या उघडीवाटेतून खारे पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली होती. भरतीच्या पाण्याने शेतात प्रवेश केल्यास जमीन नापिक होण्याचा धोका होता. खारे पाणी झिरपल्यास शेतीच्या उत्पादनक्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.

ही परिस्थिती लक्षात येताच सरपंच हर्षदा मयेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक जाणकार आणि शेतकऱ्यांशी चर्चा करून उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली. भरतीचे पाणी शेताकडे जाण्यापासून रोखण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. उघडीवाट तात्पुरती बंद करून पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला. साडेआठ वाजल्यापासून सुरू झालेली ही धावपळ साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होती. जवळपास तासभर चाललेल्या प्रयत्नांनंतर अखेर शेतामध्ये खारे पाणी जाण्यापासून रोखण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य शेती नुकसान टळले असून, अनेक शेतकऱ्यांनी सरपंच हर्षदा मयेकर यांचे आभार मानत त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले.

Exit mobile version