| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
चालू वर्षी पावसाळ्यात 25 दिवस समुद्राला मोठे उधाण येणार असून, यावेळी समुद्र किनारपट्टीवर साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असून, समुद्र तसेच खाडी किनारपट्टी भागात पाणी शिरण्याची भिती वर्तविण्यात येत आहे. कोकणातील समुद्र तसेच खाडी किनार्यावरील गावांना याचा फटका बसणार आहे. उधानावेळी मुसळधार पाऊस पडल्यास या गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता असून, रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी 53 तर खाडीकिनारी 72 अशा 125 गावांचा समावेश आहे.
पावसाळ्यात समुद्राला मोठे उधाण येत असते. उधाणामुळे समुद्र किनार्यावर उसळणार्या लाटांमुळे किनारपट्टीवरील भागात समुद्राचे पाणी शिरते. त्यातच मुसळधार पाऊस पडल्यास 26 जुलै 2005 सारखी पूरस्थिती निर्माण होऊ शकते. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडील वेळापत्रकानुसार यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला 25 दिवस मोठे उधाण येणार आहे. यावेळी साडेचार मीटरपेक्षा उंच लाटा उसळणार असून, 1 सप्टेंबर रोजी 4.88 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या उधाणाचा सर्वात मोठा फटका कोकणातील समुद्र तसेच खाडी किनार्यावरील गावांना बसणार आहे. उधानावेळी मुसळधार पाऊस पडल्यास या गावांना पूरस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची तयारी संबंधित जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सुरु केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात तालुकास्तरावरुन आद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागांनी मागविले असून ते आल्यानंतर पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात येणार आहेत.