उद्या वेश्वी येथे जाहीरसभा; आ. जयंत पाटील, अनंत गीते करणार मार्गदर्शन
। रायगड । खास प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होईल असे वाटत होते. मात्र, इंडिया आघाडीतील घटक पक्ष हे शिवसेनेच्या (ठाकरे गट) अनंत गीते यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ, ग्रामपंचायत, गाव आणि शहरातील प्रभागनिहाय प्रचार बैठका घेतल्या जात आहेत. त्यांना चांगला पाठिंबा मिळत असल्याचे दिसते. सोमवारी सायंकाळी सहा वाजता अलिबाग-वेश्वी येथे गीतेंच्या प्रचारासाठी जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
धनशक्तीविरोधात जनशक्ती असाच सामना होताना दिसत आहे. तटकरेंना पुन्हा निवडून देणार नाही, असे जनताच आता उघडपणे बोलू लागली आहे. संविधान बदलण्याची तयारी करणाऱ्या भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना शिंदे गटाला धडा शिकवण्याची शपथ इंडिया आघाडीतील शेकापसह काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने घेतली आहे. अनंत गीते यांच्या विजयासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी जोरदार कामाला लागले आहेत. दररोज प्रत्येक ठिकाणी प्रचारसभा, गाव बैठका, कॉर्नर सभा, प्रचार रॅली, घरभेटींवर भर दिला जात असल्याने मतदारांचे मन वळवण्यात त्यांना यश येत असल्याचे चित्र आहे. नुकतीच अलिबाग-चेंढरे हद्दीतील इंडिया आघाडीतील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, तसेच सोमवारी वेश्वी येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्यासह अलिबाग शहर, थळ, चेंढरे जिल्हा परिषद मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे शेकापचे अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या आधी विरोधात असणारा शिंदे आणि भाजपाचा एक गट मनापासून काम करणार का, हादेखील प्रश्न आहे. तटकरेंच्या प्रचारासाठी दिग्गज मैदानात उतरत असतानादेखील गीतेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उध्दव ठाकरे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आदित्य ठाकरे असे प्रमुख नेते मैदानात आहेत. त्यांच्यासोबत त्यांची फौज असल्याने प्रचारामध्ये त्यांच्याकडून मतदारांवर प्रभाव पाडण्यात त्यांना यश असल्याचे विविध प्रचारसभांमधून दिसून येते. गीतेंच्या प्रचारासाठी नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस केला आहे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे ते गीतेंच्या प्रचारासाठी धावत आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गीतेंसाठी दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.