सरकारची प्रसिध्दी, प्रवाशांची फरफट

जिल्ह्यातील दीडशे एसटी बसेस रत्नागिरीत

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रत्नागिरी येथे होणार्‍या एका शासकिय कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून दीडशे गाड्या पाठविण्यात आल्या आहेत. त्याचा फटका आज जिल्ह्यातील प्रवाशांसह विद्यार्थी, महिला वर्गाला बसला. सरकारी प्रसिध्दी आणि प्रवाशांची फरफट अशी अवस्था निर्माण झाल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. गोपाळकालासह, गणेशोत्सवासारखे अनेक सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे सध्या प्रवाशांचा हंगाम सुरू झाला आहे. एसटीतून जाणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडू लागली आहे. मात्र रत्नागिरीमध्ये बुधवारी दुपारी लाकडी बहिण योजनेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार आहेत. या कार्यक्रमात गर्दी व्हावी यासाठी कार्यकर्त्यांसह अनेक मंडळींची ने-आण करण्यासाठी राज्यातून एक हजार 150 एसटी बसेस मागविण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यातून सुमारे 150 बसेसचा समावेश आहे. बुधवारी हा कार्यक्रम असला, तरीदेखील आज जिल्ह्यातून एसटी बसेस पाठविण्यात आल्या आहेत. बुधवारी सकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी तेथील कार्यकर्ते, नागरिकांना ने-आण करण्याचे काम बसेसद्वारे होणार आहे. आदल्या दिवसापासूनच एसटी बसेसच्या तीनशेहून अधिक फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. आज सकाळी शाळा कॉलेजमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसायनिमित्त जाणार्‍या महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर मंडळींची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे काही विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. अनेकांनी त्यांच्या निश्‍चित स्थळी पोहचण्यास दोन ते तीन तास विलंब झाला.

पनवेल स्थानकात प्रवाशांची गर्दी
अलिबाग -पनवेल जाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवसाला दहा ते बारा एसटीच्या फेर्‍या या मार्गावरून असतात. परंतु अचानक शासकीय कार्यक्रमासाठी एसटी फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचा फटका पनवेल - अलिबाग प्रवास करणार्‍या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. पनवेल एसटी बस स्थानकात तासनतास एसटीची वाट पहात प्रवाशांना ताटकळत राहवे लागले आहे.

लांब पल्ल्याच्या बसेस बंद
अलिबाग एसटी बस आगारातून अक्कलकोट, शिर्डी, सातारा, पंढरपूर या ठिकाणी जाण्यासाठी एसटी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ प्रवासी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. रोज 70हून अधिक प्रवासी जागा आरक्षित करीत असून काही प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावरील एसटीला प्रचंड गर्दी आहे. परंतु अचानक या एसटी सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसला. एसटी महामंडळाच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
वरिष्ठांच्या दबावामुळे रायगडमधून बसेस पाठविण्याची वेळ
राज्यातील प्रत्येक विभाग नियंत्र कार्यालयाकडून एसटी बसेसची मागणी मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली. सध्या सणासुदीचा हंगाम आहे. त्यामुळे इतक्या बसेस पाठविणे शक्य होणार नाही, ही बाबत वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु,वरिष्ठांच्या दबावापुढे विभाग नियंत्रक कार्यालयाला नमते घ्यावे लागले. दाबामुळे रायगडमधून 150 बसेस पाठविण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून मिळाली.
रत्नागिरीत पाठविण्यात आलेल्या बसेस
अलिबाग - 54
पेण -02
कर्जत - 02
श्रीवर्धन- 30
माणगाव - 20
रोहा - 15
मुरूड -26

परीक्षेचा हंगाम सुरु झाला आहे. सकाळी कॉलेजमध्ये जाण्यासाठी स्थानकात उभा होतो. अर्धा एक तास होऊनही बस आली नाही. त्यामुळे माहिती घेतल्यावर समजले की, एसटी फेरीच रद्द आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये जाणे शक्य झाले नाही.

आकाश जाधव
विद्यार्थी

सकाळी कामावर जाण्यासाठी एसटी वाट पहात उभा होतो. मात्र वेळेवर एसटी आलीच नाही. त्यामुळे मोठी गैरसोय झाली. अखेर मिळेल त्या वाहनाचा आधार घेत निश्‍चित स्थळी पोहचलो. मात्र खुपच उशीर झाला.

राकेश पाटील
प्रवासी
Exit mobile version