ग्राहक उन्हात ताटकळत उभे; संतप्त ग्राहकांनी गाठले तहसील कार्यालय
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात घरगुती गॅस पुरवठ्याचा अक्षरशः खेळखंडोबा झाला असून, एचपी गॅस एजन्सीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पाली येथील एचपी गॅसचे कार्यालय बंद केल्याने ग्राहकांना तब्बल 25 किलोमीटर अंतरावरील रोहा तालुक्यातील भागाड येथे जावे लागत आहे. या धावपळीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ऐन उन्हाळ्यात गॅसची टंचाई नागरिकांना बेजार करीत आहे. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना अक्षरशः रांगांमध्ये ताटकळत उभे राहावे लागत आहे. उन्हाच्या तीव्र झळा सहन करत तासंतास प्रतीक्षा करूनही अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गॅस पुरवठ्यात होत असलेल्या विलंबामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. महिलांना विशेषतः या समस्येचा अधिक त्रास सहन करावा लागत असून, रोजच्या स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला गॅस वेळेत मिळत नसल्याने कुटुंबांची दिनचर्या विस्कळीत झाली आहे. गॅससाठी नोंदणी करूनही ओटीपी न येणे, ग्राहक क्रमांक अवैध दाखविणे, तांत्रिक त्रुटींचा भडीमार-यामुळे ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत. या चुका नेमक्या कोणाच्या आणि त्याचे उत्तरदायित्व कोणाचे? असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. संतप्त ग्राहकांनी नायब तहसीलदार भारत फुलपगारे व पुरवठा निरीक्षक अधिकारी सुखदेव वाढणकर यांच्या समोर समस्यांचा पाढा वाचला. प्रशासनालाही परिस्थितीची तीव्रता लक्षात येताच संबंधित एजन्सीला तात्काळ फोन करून कानउघाडणी करण्यात आली.
पाली येथे त्वरित कार्यालय सुरू करावे, ज्या ग्राहकांचा नंबर लागला आहे आणि ओटीपी प्राप्त झाला आहे, त्यांना गॅस घरपोच द्यावा, अशा सक्त सूचना एजन्सीला देण्यात आल्या. तरीही प्रश्न कायम सूचना कागदावरच राहणार का ? असा प्रश्न ग्राहकांनी केला. दरम्यान, गॅस सिलेंडरसाठी येणाऱ्या ग्राहकांना कार्यालयाबाहेर उन्हात ताटकळत उभे राहावे लागते. ना सावली, ना पाणी, ना कोणतीही सोय ही अवस्था प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देत आहे.
सुधागड तालुक्यातील सुमारे तीन हजार ग्राहकांना शासनाच्या नियमानुसार गॅस पुरवठा करणे ही एजन्सीची जबाबदारी असताना, प्रत्यक्षात मात्र सेवेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. परिस्थितीत तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. आता तरी यंत्रणा जागी होणार का, की ग्राहकांची हीच परवड सुरू राहणार का हा खरा प्रश्न आहे.
नागरिकांची मागणी
गॅस सिलेंडरचा नियमित व वेळेवर पुरवठा करवा. रांगा टाळण्यासाठी टोकन प्रणाली लागू करावी. सुधागड तालुक्यातील ही समस्या तातडीने सोडवली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
