। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा प्रशासन रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्यात उदासीन असल्याची टिका शेकाप नेते पंडित पाटील यांनी केली आहे. राज्याच्या अन्य विभागात रोहयोमधून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जातात आणि त्याचा फायदा गरजूंना होतो. रायगडात मात्र रोहयो योजनेतून एकही काम नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात चौकशी केली असता प्रशासनाकडून टोलवाटोलवी केली जाते हेही त्यांनी निदर्शनास आणले.
अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जप्त केलेली वाहने ठिकठिकाणी आढळून येतात. मात्र ती बाजूला काढण्यात प्रशासन प्रयत्न का करीत नाही, अशी विचारणा त्यांनी केली. रस्त्यावर ठिकठिकाणी वाढलेल्या गवतावरुनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात दुभाजकांवर गवत वाढले आहे. ते काढण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? प्रशासन याबाबत जबाबदारी घेत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.