खारेपाटातील शहाबाज गावचे ज्येष्ठ शिक्षक, शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे टी.डी. पाटील सर यांच्या निधनाने शैक्षणिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. एनसीसी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळविणारे आणि हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. इंग्रजी विषयावर प्रभुत्व, प्रभावी अध्यापनशैली आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त रुजविण्याची हातोटी यामुळे टी.डी. पाटील सर हे विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षक नव्हते, तर प्रेरणास्थान होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पोलीस दल, सैन्य दल आणि विविध शासकीय सेवांमध्ये जाण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत आहेत.
सुरवातीला ते उरणमध्ये नोकरी करीत होते. स्व.ना.ना.पाटील यांनी त्यांना पोयनाड हायस्कूलमध्ये आणले आणि ते शेवटपर्यंत राहिले. टी.डी. पाटील यांनी शेवटपर्यंत शिक्षण क्षेत्रात योगदान दिले. त्यांचा दरारा असा होता की, ते वर्गात आले की विद्यार्थ्यांमध्ये शांतता पसरत असे; मात्र त्या दराऱ्यामागे विद्यार्थ्यांबद्दल असलेली माया आणि त्यांना घडविण्याची तळमळ होती. गरीब परिस्थितीतून स्वतःचा संघर्ष करत उभे राहिलेले टी.डी. पाटील यांनी सामाजिक आणि राजकीय बांधिलकीही जपली. शेकापच्या विचारांशी अखेरपर्यंत निष्ठावान राहणारे पाटील सर यांनी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. खारेपाटातील पोयनाडचे मामलेदार पाटील यांच्या नातीसोबत त्यांचा विवाह झाला. ते घराणे एक प्रतिष्ठित घराणे म्हणून तेव्हापासून ते आजपर्यंत ओखळले जाते. त्या कुटूंबाची एक वेगळी छाप होती.
टी.डी.पाटील त्या कुटूंबांचे जावई झाले, हे पाहून अनेक लोकांना त्यावेळी आश्चर्य वाटले. आठवीत असताना वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेतला होता. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी भाषण केले. ते प्रभावी भाषण ऐकून पाटील सरांनी पाठ थोपटली. ज्यावेळी विधिमंडळात पहिल्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणून सन्मान करण्यात आला, त्यावेळी सरांच्या शाबासकीची आठवण झाली. घरी परतल्यावर त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्यांच्या शिकवणीमुळे हा सन्मान मिळाल्याचे सांगताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्यांना झालेला आनंद माझ्या कामाची पोचपावती आहे.
क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान तितकेच मोठे होते. कबड्डी, विविध खेळ आणि एनसीसी क्षेत्रात त्यांनी असंख्य खेळाडू घडवले. खालापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष जंगम यांचे वडील गुरुनाथ जंगम यांना घडविण्यामागे टी.डी. पाटील सरांचा मोठा वाटा होता. त्यांच्या कठोर शिस्तीच्या आणि मार्गदर्शनाच्या तालमीत गुरुनाथ जंगम यांनी महाराष्ट्रातील अव्वल एनसीसी कॅडेट म्हणून नाव कमावले. राज्यस्तरापुरतेच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, पाटील सरांचे योगदान इतक्यावर थांबले नाही. एनसीसीमधील यशानंतर त्यांनी गुरुनाथ जंगम यांना पोलीस सेवेत जाण्यासाठी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे नव्हे, तर त्यांचे भविष्य घडवणे, हीच टी.डी. पाटील सरांची खरी ओळख होती. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेक जुने मित्र, विद्यार्थी आणि सहकारी श्रद्धांजली वाहण्यासाठी घरी आले. “इतके लोक भेटायला आले की, त्यांना सगळ्यांना ओळखतही नव्हतो,” असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याप्ती पुन्हा एकदा समोर आली. पाटील सरांचे शहाबाजचे बालमित्र आगरी समाजासाठी झटणारे भाऊ पाटील, आदर्श शिक्षक गोपीनाथ पाटील यांची जीवलग मैत्री होती. त्यांनी शेवटपर्यंत मैत्री जपल्याचे आम्ही बघितलं. स्व. नाना पाटील यांनी अनेक शिक्षक घडविले. पण टी.डी. पाटील हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं, हे आमचे खारेपाट विसरू शकणार नाही. पाटील सर यांनी घडवलेले विद्यार्थी, रुजवलेली शिस्त, दिलेली मूल्ये आणि शिक्षण क्रीडा क्षेत्रातील योगदान यामुळे खारेपाट त्यांना कधीच विसरणार नाही. खऱ्या अर्थाने खारेपाटातील एक रत्न काळाच्या पडद्याआड गेले आहे.
माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांनी प्रेरणा निर्माण केली. यश मिळाल्यावर त्यांनी दिलेली शाबासकी, पाठीवर मारलेली थाप आणि डोळ्यांमध्ये दिसणारा आनंद आजही आठवतो. त्यांच्या निधनाने खारेपाटाने एक शिक्षक नाही, तर एक संस्कारवंत व्यक्तिमत्त्व गमावले आहे. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी घडवलेली पिढी आणि दिलेले संस्कार कायम त्यांची आठवण करून देत राहतील. टी.डी. पाटील सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.
रायगड जिल्ह्याचा ‘एनसीसी मॅन’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
