पोलीस दलाच्या ताफ्यात 15 नवीन वाहने
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला तब्बल एक कोटी 91 लाख किमतीची 15 वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. रस्ते अपघातासंदर्भातील किट व साधन सामुग्री खरेदीकरिता दोन कोटी रुपये, बॉम्बशोधक व नाशक पथक साहित्य खरेदीसाठी 10 लाख रुपये आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 23 लाख असा एकूण चार कोटी 23 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे रायगड पोलीस दलाचा कारभार गतिमान होण्यास मदत होणार आहे.
रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी वाहनांचे वितरण पोलिसांना करण्यात आले. पुढच्या वर्षी माणगाव, खोपोली, पेण, उरण येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सहा कोटी 40 लाख देण्यात येत आहेत, असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना नवीन वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत. सर्व अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व सचोटीने करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रायगड जिल्हा प्रशासन गतिमान करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणांचे सक्षमीकरण आणि बळकटीकरणावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे आदी उपस्थित होते.
पोलीस दलाला एक कोटी 91 लाख 12 हजार 297 रुपयांच्या निधीतून तीन स्कॉर्पिओ, दोन एमयूव्ही, 8 बोलेरो, दोन फोर्स तुफान अशी 15 वाहने उपलब्ध झाली आहेत.