| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपटा ते सारसई पाताळगंगा नदीवरील रेल्वे पूलावरील पत्रे जीर्ण झाले होते. पुलावरील पत्रे बदलून दुरुस्ती करावी तसेच आपटा ते सारसई पाताळगंगा नदीवर नवीन रेल्वे पादचारी पूल बांधावा, अशी मागणी आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंच नाजनीन पटेल यांनी मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य अभिजीत पाटील यांच्याकडे केली होती. या अनुषंगाने पाटील यांनी रेल्वे मंत्रालयासह वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करून रेल्वे पुलावरील पत्रे बदलण्यात आले आहेत.
आपटा गावासह परिसरातील नागरिकांना जाण्यायेण्यासाठी इतर कोणतीही व्यवस्था नसल्याने पाताळगंगा नदीवरील रेल्वे पूलाचा वापर केला जातो. सारसई येथील आठ आदिवासी वाडीतील ग्रामस्थ रेल्वे पूलाचा वापर करत असून सदर पूलाचा वापर केल्याने अनेक आदिवासी व इतर ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे गावातील तसेच आदिवासी वाडीवस्तीतील सुमारे 40 ते 50 ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अनुषंगाने ग्रामस्थांच्या जाण्या-येण्यासाठी रेल्वे पूलाला समांतर पूल बांधावा, अशी मागणी पाटील यांनी मध्य रेल्वे मंत्रालयाकडे लावून धरली आहे. या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून सर्वप्रथम या रेल्वे पुलावरील जीर्ण झालेले पत्रे बदलण्यात आले आहेत.
पुलावरील धोकादायक अवस्थेतील पत्रे रेल्वे प्रशासनाकडून बदलण्यात आले याबद्दल रेल्वे मंत्रालयाचे आभार. परंतु त्याचबरोबर आपटा गावाजवळील पाताळगंगा नदीवरील रेल्वे पुलाला पादचारी जोडपूल बांधावा ही रेल्वे मंत्रालयाकडे केलेली मुख्य मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याबाबत पाठपुरावा केला जाईल.
अभिजीत पाटील
मध्य रेल्वे, भारत सरकार- सल्लागार सदस्य