| रायगड | खास प्रतिनिधी |
जुलै महिन्यात पावसाने राज्यासह रायगड जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. पावसाने आता काही काळ विश्रांती घेतल्याने जोरदार पडणारा पाऊस दमल्याचे दिसून येत आहे. पावसामुळे शेतात लावलेले भाताचे पीक काही प्रमाणात नष्ट झाले आहे. शेती ओसाड राहू नये म्हणून शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून राब (भाताचे रोप) घेऊन ते शेतात लावण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. भातशेती वाचवण्याचा शेतकऱ्यांचा हा अखेरचा प्रयत्न असला तरी, त्यामुळे काही प्रमाणात शेतातील पीक वाचण्यास मदत होणार आहे. 12 ते 16 ऑगस्ट या कालावधीत आकाश निरभ्र राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून उशिरा दाखल झाला तरी त्याने तुफान बरसून जनजीवन विस्कळीत केले. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. नद्या नाल्यांना महापूर तसेच दरडी पडण्याच्या घटनांमुळे प्रशासनाने हजारो नागरिकांचे स्थलांतर केले होते. आता मात्र पाऊस दमला आहे. त्याने उघडीप दिल्याने वातावरणात पुन्हा एकदा उष्णता जाणवत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
पावसाच्या विश्रांतीमुळे शेतीच्या कामांनीही वेग घेतला आहे. शहरालगतच्या गावांमध्ये पाल्याभाज्या पुन्हा बहरल्या आहेत. त्यामुळे स्थानिक बाजारात आता पालेभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने पालेभाज्या वाजवी किमतीमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पुणे तसेच वाशी बाजारातून होणाऱ्या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात मंदावली आहे. स्थानिक बाजारात मिळणाऱ्या पालेभाज्यांना मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पावसाच्या पाण्यात काही शेतकऱ्यांच्या शेतातील पीक वाया गेले आहे. त्यांनी आता आपल्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाताचे राब (रोपे) घेतले आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतात काही प्रमाणात भाताचे पीक डौलाने उभे राहण्याची आशा पल्लवीत झाली आहे. शेतकरी एकमेकांना अडीअडचणीच्या कालावधीत अशी मदत करत असल्यानेच सर्वसामान्यांच्या ताटात अन्नधान्य मिळत आहे.