| धाटाव | वार्ताहर |
तालुक्याचे ठिकाण असलेल्या रोह्यासाठी तब्बल एकदीड वर्षे पूर्णवेळ पशु वैद्यकीय अधिकारीच नाहीत, अधिकाऱ्यांची वानवा असल्याचे भयाण चित्र आहे. सद्यःस्थितीत नियुक्त असलेले अतिरिक्त पशु वैद्यकीय अधिकारी अक्षय सांगळे हे कार्यालयीन दवाखान्यात फार उपस्थित नसतात, -ठरवून दिलेल्या वारात लोकांना मिळतच नाहीत. त्यामुळे रोहा शहर व आजूबाजूची गावे, दुर्गम भागातील पशुधन यांसह सर्वच प्राण्यांवर वेळेत उपचार होत नाहीत, याबाबत अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यात. गुरंढोरं, बकऱ्या, कोंबड्या यांसह सर्वच पाळीव प्राण्यांवर योग्य व वेळेत उपचार होत नाहीत. अशाने पशुधन अक्षरशः धोक्यात येत आहे. याबाबत पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना गांभीर्य आहे की नाही, अशी स्पष्ट नाराजी आता शेतकऱ्यांतून सुरू झाली आहे.
दरम्यान, ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेता रोह्यासाठी दुसरा सक्षम अधिकारी तातडीने बदलून देतो, असे ठोस आश्वासन जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम कदम यांनी दिल्याने पशुधन मालकांना मोठा दिलासा मिळाला, तर तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या बळीराजा विकास फाऊंडेशनचे सदस्य ग्रामस्थ तुकाराम मोरे यांसह विकास फाऊंडेशनच्या तक्रारींची जिल्हा पशु वैद्यकीय प्रशासनाने दखल घेतल्याने शहर व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गुरे व बकऱ्यांना वेळेत उपचार मिळत नसल्याने स्थिती अधिक गंभीर होते, त्यासाठी रोहा शहर, ग्रामीणसाठी स्वतंत्र पूर्णवेळ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अनेकदा झाली. मुळात, अतिरिक्त नियुक्त डॉ. अक्षय सांगळे हे कार्यालय दवाखान्यात अनेकांना मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची अधिक गैरसोय होते. त्यामुळे सक्षम पशु वैद्यकीय अधिकारी नियुक्त करा, अशा मागणीला आता जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अक्षरशः हिरवा कंदील दिला.
वैद्यकीय अधिकारी बदलून देतो
जिल्ह्यात तब्बल 20 जागा पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या खाली आहेत. पशुधन पर्यवेक्षकांच्या तब्बल 40 जागा रिक्त आहेत. त्यामुळे ही गंभीर स्थिती आहे, अशी वास्तवता सांगत रोहा शहर व ग्रामीणासाठी सक्षम पशु वैद्यकीय अधिकारी बदलून देतो, असे आश्वासन जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम कदम यांनी दिले आहे.
बळीराजा विकास फाऊंडेशनच्या शेतकऱ्यांच्या वतीने केलेल्या तक्रारीची दखल जिल्हा पशु वैद्यकीय प्रशासनाने घेतल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. तर, सक्षम पशु वैद्यकीय अधिकारी तातडीने बदलून न दिल्यास प्रशासनाला भानावर आणू.
विठ्ठल मोरे, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन