। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड पोलीस दलातील 422 जागांसाठी शुक्रवारी (दि.21) पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. त्याची तयारी दलामार्फत करण्यात आली आहे. मात्र गुरुवारपासून पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे या मैदानी चाचणीवर पावसाचे विरजण पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रायगड पोलीस दलातील शिपाई, चालक व बॅन्ड्समन या 422 पदासाठी 31 हजार 63 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारपासून (दि.21) उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ही चाचणी नेहुली येथील जिल्हा क्रिडा संकूल व कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीमधील क्रीडा संकुलामध्ये घेतली जाणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलमध्ये कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप, शंभर मीटर धावणे व गोळा फेक चाचणी घेण्यात येणार आहे. तर आरसीएफच्या क्रीडा संकुलात 1600 व 800 मीटर धावणे ही चाचणी घेतली जाणार आहे. पहिल्या दिवशी पाचशे त्यानंतर आठ दिवसानंतर 800 उमेदवारांना चाचणीसाठी बोलावले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे.
यासाठी सुमारे 250 पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे. भरतीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. अलिबागसह अनेक भागात पाऊस पडत आहे. सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. जिल्हा क्रीडा संकुलामध्येदेखील पाणी साचले आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रक्रियेवर विरजण पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रीया पावसामुळे पुढे जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक घार्गे काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक घार्गे यांच्याशी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही.