मुस्लिम बांधवांना अलिबाग पोलिसांकडून शुभेच्छा
| सोगाव | वार्ताहर |
मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण म्हणजे रमजान ईद. मुस्लिम बांधव रमजान महिन्यात महिनाभर उपवास (रोजे) करतात. महिन्याच्या शेवटी रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्या रमजान ईदचे चंद्रदर्शन शुक्रवारी झाल्याने शनिवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

रमजान ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी सकाळी विशेष नमाजासाठी अलिबाग शहरातील मुख्य मशिदीमध्ये मोठी गर्दी केली होती. यावेळी अलिबाग पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव चोख बंदोबस्त ठेवला होता. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी अलिबाग पोलीस निरीक्षक सणस यांनी पोलीस सहकार्यांसोबत मशिदीत जाऊन मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देत शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांचा स्वीकार करत मुस्लिम बांधवांनी अलिबाग पोलीस निरीक्षक सणस व इतर सहकारी पोलीस यांचे मनापासून आभार मानले.
मुरूड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी; ईदगाह येथे 2500 बांधवांकडून सामूहिक नमाज अदा
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यात शनिवारी मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने मुस्लिम-हिंदू बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रमजान हा मुस्लिम बांधवाचा पवित्र आणि उपवासाचा महिना म्हणून पाळला जातो. रमजान ईदला ‘ईद- उल- फित्र’ म्हटले जाते. या महिन्यांत 30 दिवस रोजे पाळणारे मुस्लिम बांधव ईदच्या दिवशी मशीदमध्ये सकाळी विशेष नमाज अदा करतात. हा अत्यंत सौहार्द आणि खुशीचा दिवस मानला जातो. नवीन कपडे परिधान करून सर्वजण एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक देतात. शिरकुरमा, गोड पदार्थ करून हिंदू-मुस्लिम बांधवांना आमंत्रित केले जाते. दुसरी बकरी ईददेखील साजरी केली जाते. याला ‘ईद-उल-दुहा’ असे म्हटले जाते.

रमजान ईद निमिताने मुरूड जवळील नबाबकालीन ईडगाह येथे परंपरेप्रमाणे सुमारे 2500 मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून एकमेकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. छोटी मुले, वयस्कर बांधवानी पेठ मोहल्ला, बाजार मोहल्ला येथील मशिदीत नमाज अदा केली. जंजिरा संस्थान काळात जंजिरा नबाब यांनी मुरूड जवळील पहाडावर 100 वर्षांपूर्वी ईदगाह ची निर्मिती केली आहे.

मुस्लिम कसबा मुरूड ईदगाह ट्रस्ट रजिस्टर्ड असून, सर्व पदाधिकारी उत्तमपणे कार्य करीत असल्याची माहिती या ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष राशीद फहीम, यांनी दिली.ईदगाह जवळ जागा कमी पडत असल्याने 100 बाय 100 चा नवीन चबुतरा बांधण्यात आला आहे. संस्थान कालखंडात स्वतः नबाबदेखील सामूहिक नमाज अदा करण्यासाठी हजर असत, अशी माहिती बुजुर्ग मंडळीं आणि अध्यक्ष राशीद फहीम यांनी दिली. पोलीस निरीक्षक प्रकाश संकपाळ आणि पोलीसदेखील ईदगाह येथे उपस्थित होते.
माणगाव तालुक्यात सर्वत्र रमजान ईद उत्साहात साजरी
| माणगाव | प्रतिनिधी |
रमजान ईद माणगाव तालुक्यात शनिवार दि. 22 एप्रिल रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. या ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी ईदची मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा केल्यावर गळाभेट आलिंगन देत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपच्या पंचायतराज व ग्रामविकास विभाग कोकण संयोजक शर्मिला सत्वे, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, नगरसेवक राजेश मेहता, नगरपंचायतीचे स्वच्छता सभापती दिनेश रातवडकर, पाणी पुरवठा सभापती कपिल गायकवाड, नगरसेविका ममता थोरे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पारखे, शिवाजी सत्वे, प्रा. हर्षल जोशी, शिक्षक शंकर शिंदे, पोलीस कर्मचारी रामनाथ डोईफोडे व पत्रकार बांधव यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत त्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.काही हिंदू बांधवानी दूरध्वनी व मोबाईल वरून संदेश पाठवून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

माणगाव तालुक्यातील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला,बाजारटेप मोहल्ला, नाणोरे, लोणशी, मोर्बा, साई, निजामपूर, दहिवलीकोंड, दहिवली, तारणा, वडवली, मांजरवणे, नांदवी, पुरार , वणी, मलई कोंड, हारकोल, गोरेगाव, टेमपाले, लाखपाले, देवळी, टोळ, टोळ खुर्द आदी सर्वच गावांतून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला येथील जामा मशिदीत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत मुस्लिम बांधवानी रमजान ईदची सामुदायिक नमाज अदा केली.
म्हसळ्यात ईदचा उत्साह
|म्हसळा | वार्ताहर |
मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना काल संपला. या महिनाभर रोजे करण्यात येतात. आज तालुक्यात सर्वत्र ईद अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. म्हसळा येथील मुख्य जामा मस्जिद ते उदगाहपर्यंत मुस्लिम समाजातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व मुस्लिम बंधू भगिनी एकत्र येऊन ईदची नमाज अदा केली. नमाज संपल्यानंतर सर्वांनी एकमेकांना हस्तालोंदन करून गळा भेटी केल्या.

या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत रामेश्वर स्वामी, तहसीलदार समीर घारे, निवासी नायब तहसीलदार गणेश तेलंगे, पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, उपनिरीक्षक सूर्यवंशी, मुस्लिम समाज अध्यक्ष नाझिम चोगले, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष समिर बनकर, गटनेते संजय कर्णिक, योगेश करडे, नाझिम हसवारे, नगराध्यक्ष असल कादिरी, फझल हलडे, नासिर मिठागरे, मोहंमद पेनकर, सईद अहमद कादिरी, नईम दळवी, सलीम चोगलेअशोक काते आदि मान्यवर, मुस्लिम बांधव, भगिनी फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खोपोली पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी शिळफाटा येथील मज्जिद बाहेर उभे राहून नमाज पडून बाहेर येणार्या मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुले देत रमजान ईदच्या शुभेच्छा देण्याचा अनोखा कार्यक्रम साजरा करीत सामाजिक सलोखा राखल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

खोपोली शहरात देशभरातील विविध प्रांतातील लोक गुण्यागोविंदाने राहत असल्याने छोटे भारत म्हणून ओळखले जाते.सर्व धर्मीय आपआपले सण साजरे करीत खोपोलीचे ऐक्य जपत आहेत. आज योगायोगाने रमजान ईद आणि अक्षय तृतिया सण एकाच दिवशी आल्याने दोन्हीही सण मोठ्या उत्साहात पार पडले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच होणारी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलिस निरिक्षक शिरिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेष काळसेकर यांच्यासह उप पोलीस निरीक्षक सुधाकर लहाने आणि संपूर्ण पोलिस कर्मचार्या यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सर्वपक्षीयांनी शुभेच्छा देण्याची परंपरा कायम ठेवत उद्योजक अबूशेठ जळगांवकर यांचे निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शेकापक्षाचे किशोर पाटील, तालुका चिटणीस संदीप पाटील, शहर चिटणीस अविनाश तावडे, खजिनदार जयंत पाठक, शांताराम पाटील, केटीएसपीचे उपाध्यक्ष संजय पाटील, दिलीप पोरवाल, दिनेश गुरव, राजू अभाणी, नरेंद्र शहा, शिंदे गटाचे समन्वयक बाबू पोटे, अनंता हाडप उपस्थित होते.