क्रीडांगणावर चौकार-षटकांरांची आतषबाजी; चार संघ सुपर आठमध्ये दाखल
| रायगड | प्रतिनिधी |
रामराज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मोहन दत्तात्रेय धुमाळ पुरस्कृत रामराज विभाग प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तब्बल दहा सामान्यांचा खेळ झाला. या सामन्यांमधून चार संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरले. पहिल्या दिवशी धावीर क्रीडांगणावर झालेल्या सामन्यांमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी प्रेक्षकांना पहावयास मिळाली. एका सामन्यात खेळाडूंच्या अटीतटीच्या खेळामुळे सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्ये जाऊन सामन्याचा निकाल लागला. एक सामन्यात महानवाडीतील खेळाडू अनिकेत चिखले याने धुरंधर खेळ करीत संघाला केवळ विजयच मिळवून दिला नाही तर आपल्या फटकेबाजीने हाफ सेंच्युरी करीत प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडले. दैनिक कृषीवल माध्यम प्रायोजक असणाऱ्या या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले.
पहिल्या दिवशी पहिल्या फेरीचे सामने खेळविण्यात आले. नीर ताजपुर आणि चिचाबादेवी राजेवाडी या संघांच्या सामान्याने प्रीमिअर लीगला शुभारंभ झाला. पहिल्या सामन्यात नीर ताजपुर संघाने चिचाबादेवी राजेवाडी संघाला पराभूत केले. त्यांनतर जयभवानी उमटे आणि निर्वी 11 सत्तेवाडी या संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात जयभवानी उमटे संघ विजयी झाला. यानंतर ज्ञानी 11 नांगरवाडी आणि अनवी 11 रामराज कोळीवाडा या संघांमध्ये सामना झाला. या सामन्यात अनवी 11 रामराज कोळीवाडा संघाने बाजी मारली. महेश झावरे पुरस्कृत भिलजी आणि काश्मित 11 नांगरवाडी या संघांमध्ये सामना रंगला. हा सामना महेश झावरे पुरस्कृत भिलजी संघाने जिंकला.
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय भवानी उमटे आणि नीर 11 ताजपूर यांच्यात झाला. या सामन्यांमध्ये नीर 11 ताजपूर संघ विजयी झाला. दुसरा सामना महेश झावरे पुरस्कृत भिलजी आणि अन्वी 11 रामराज कोळीवाडा यांच्यात रंगला. हा सामना अटीतटीचा झाला. या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. शेवटच्या चेंडूवर खेळाडूला दोन धाव करायच्या होत्या. परंतु एकच धाव करण्यात खेळाडूला यश आल्याने हा सामना अनिर्णित राहिला आणि सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला. हा सामना अन्वी 11 रामराज कोळीवाडा संघाने जिंकला. तिसरा सामना निर्वी 11 सत्तेवाडी आणि चिंचबादेवी राजेवाडी या संघांमध्ये झाला. हा सामना चिंचबादेवी राजेवाडी या संघाने जिंकला या सामन्यात खरे लक्ष वेधले ते महानवाडी येथील खेळाडू अनिकेत चिखले याने. त्याने हा सामना संघाला जिंकून देताना त्याने वैयक्तीक 50 धाव करीत प्रेक्षकांचे लक्ष वेधले. चौथा सामान ज्ञानी 11 नांगरवाडी आणि काश्मित 11 नांगरवाडी या संघांमध्ये झाला. हा सामना ज्ञानी 11 नांगरवाडी संघाने जिंकला. पाचवा सामना चिंचबादेवी राजेवाडी आणि जय भवानी उमटे या संघांमध्ये खेळाला गेला. या सामन्यात चिंचबादेवी राजेवाडी संघ विजयी झाला. पहिल्या दिवसातील शेवटचा सामना महेश झावरे पुरस्कृत भिलजी आणि ज्ञानी 11 नांगरवाडी यांच्यात झाला. या अटीतटीच्या सामन्यात महेश झावरे पुरस्कृत भिलजी संघाने विजय मिळवला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर चार संघ सुपर आठयामध्ये पात्र ठरले त्यामध्ये नीर 11 ताजपूर , चिचबादेवी राजेवाडी, अन्वी 11 रामराज कोळीवाडा आणि महेश झावरे पुरस्कृत भिलजी हे चार संघ सुपर आठमध्ये पोहोचले आहेत.
